मुंबई - उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार २०२२-२३ चा अर्थसंकल्प मांडत आहेत. यापूर्वी गुरूवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. कृषी क्षेत्राने कोरोनाच्या कठीण काळात दिलेला हात यंदा मात्र जरा आखडता घेतला. तर निर्बंध हटल्यानंतर परत भरारी घेत उद्योग व सेवा क्षेत्राने राज्याच्या प्रगतीला बळ दिल्याचे चित्र २०२१-२२ च्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. याच दरम्यान उद्योगांसाठी विशेष सवलत देणार आणि इनोव्हेशन हब उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
होतकरू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी मुंबई, नाशिक आणि नागपूरमध्ये संस्था. नॅनो, जैव तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञानासाठी प्रत्येक महसूल विभागात एक इनोव्हेशन हब उभारणार. उद्योगांसाठी विशेष सवलत देण्यात येणार आहे. तसेच संदेशवहन उपग्रहण, ड्रोन टेक्नॉलॉजी जागतिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना संधी मिळावी म्हणून इनोव्हेशन हब सुरू करण्यात येणार असून प्रत्येक विभागात स्थापना होणार असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच नालेसफाईसाठी स्वयंचलित यंत्रणा स्थापणार. राज्यातील तृतीयपंथींना स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशनकार्ड देणार आहे.
शालेय शिक्षण विभागासाठी २ हजार ३५४ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागासाठी ११ हजार १९९ कोटींची तरतूद करण्यात आली. अंगणवाडी सेविकांना मोबाईल सेवा देणार. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. तसेच थोर पुरुष यांच्या मूळ गावातील शाळांना १ कोटीचा निधी देणार. थोर समाजसुधारकांच्या नावाने अध्यापन केंद्र सुरू करणार असल्याचं देखील म्हटलं आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार ऐवजी आता ७५ हजार रुपयांचं अनुदान. कृषी संशोधनासाठी अधिकचा निधी शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडला. हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संसोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. य़ाशिवाय संभाजीराजे महाराजांचं स्मारक हवेलीमध्ये उभारण्यात येणार आहे. यासाठी २५० कोटींची घोषणा केली आहे.