Maharashtra Budget 2022: जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी, दोन वर्षांत 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 02:35 PM2022-03-11T14:35:31+5:302022-03-11T14:38:25+5:30
Maharashtra Budget 2022: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान.
मुंबई: आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करत आहे. यावेळी सरकारने विविध क्षेत्रांबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात राज्याच्या जलसंपदा विभागाला भरीव निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितल्याप्रमाणे, सरकारने यंदा राज्याच्या जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. तसेच, येत्या दोन वर्षात 104 सिंच प्रकल्प पूर्ण करण्याची सरकारची योजना आहे, असेही ते म्हणाले. याशिवाय, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली आहे. याचा फायदा 20 लाख शेतकऱ्यांना होईल. यासाठी 10 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे.
यंदा 60 हजार कृषी पंपांना मोफ वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, 1 लाख हेक्टरवर फळबागा उभारण्याचे लक्ष्य असल्याचे सरकारने म्हटले आहे. शेततळ्यांच्या अनुदानाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. याशिवाय, विदर्भ, मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30 टक्केची तरतूद आता वाढवून ५० टक्के केलेली आहे. तसंच हे वर्ष महिला शेतकरी आणि मजूर वर्ष म्हणून साजरं केलं जाईल, असेही अजित पवार म्हणाले.