Jayant Patil reaction on Maharashtra Budget 2024: आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला, मात्र सरकारच्या वतीने सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ सरकारची ढासळलेली लोकप्रियता सावरण्यासाठीचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली. अर्थसंकल्पावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, "खरं म्हणजे अंतरिम अर्थसंकल्पात अशा घोषणा करायच्या नसतात. अंतरिम बजेट हे वेगळं असतं आणि नॉर्मल बजेट वेगळं असतं. नॉर्मल बजेटच्यापेक्षा पुढं जाऊन आज बजेट मांडण्याचा खटाटोप झालेला आहे. त्यापेक्षा विशेष असे या बजेटमध्ये काही नाही म्हणत त्यांनी अर्थसंकल्पाबाबत नापसंती दर्शविली."
"राज्याच्या अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्री यांनी घालून दिलेले सगळे पायंडे मोडून आज अंतरिम अर्थसंकल्पाच्या नावाखाली पूर्ण बजेट मांडला असे सांगताना सरकारने ९ हजार कोटी महसुली तुटीचं बजेट मांडले. मागच्या वर्षी १७ हजार कोटी तुटीचं बजेट मांडले आणि त्यानंतर सादर केलेल्या पुरवणी मागण्या अशा १ लाख कोटी वजा या सरकारकडे होते. या १ लाख कोटी रुपयांच्या कामांचे, घोषणांचे काय झाले? याचा खुलासा शासनाने करावा," अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
"आज हजारो कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या. ८ लाख कोटी रुपयांची कामे राज्यात सुरू आहेत असे सांगण्यात आले. हे जे काही गुलाबी चित्र तयार करण्याचे काम आहे, त्यात राज्य सरकारचा हिस्सा मर्यादीत आहे. कुठलेही आर्थिक नियोजन नाही. निवडणुका पुढ्यात बघून घोषणा केल्या आहेत. लोकांना भावनात्मक साद घालत काही रकमा घोषित केल्या आहेत. अर्थसंकल्पाचे कोणतेही नियम न पाळता हा अर्थसंकल्प मांडला आहे. लोकांना काहीतरी देतोय या आविर्भावात हा अर्थसंकल्प मांडला गेला आहे असे ते म्हणाले."