पर्यावरणपूरक शेतीसाधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प- धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 04:11 PM2024-02-27T16:11:06+5:302024-02-27T16:12:12+5:30
भविष्यातील सर्वसमावेशक विकासाची नांदी ठरणारा अर्थसंकल्प- प्रफुल पटेल
Dhananjay Munde Reaction, Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 Live: राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या निरंतर विकासाला प्राधान्य देण्यात आले असून पर्यावरणपूरक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले असल्याची प्रतिक्रिया कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अंतिम अर्थसंकल्प सादर केला. याविषयी बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, "कृषी विभागाला 3650 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आलेला आहे. वातावरणीय बदलाला सामोरे जाताना पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी बांबू लागवडीचा पर्याय जागतिक दर्जाच्या संशोधनातून पुढे आला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली असून त्या अंतर्गत 10 हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार आहे."
"शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 घोषित करून त्यासाठी 7 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप देण्यासाठी नव्या योजनेची घोषणा केली असून त्यासाठी 8 लाख 50 हजार कृषी पंपांची तरतूद करण्यात आली आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत एक लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवरील कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे," याकडे त्यांनी लक्ष वेधले.
"नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबरीने कृषी विभागाच्या अन्य योजनांनाही बळकटी देण्यासाठीचे नियोजन व सारासार विचार या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. अहमदनगर बीड परळी वैद्यनाथ या प्रतिक्षित रेल्वे मार्गाच्या कामास गती देत त्यासाठी आवश्यक तरतूद देखील करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात मूर्त स्वरूप प्राप्त झालेल्या स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत ऊसतोड कामगरांसाठी अपघात विमा योजना कार्यान्वित करण्याचीही घोषणा आज करण्यात आली आहे. विविध समाजघटकांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेल्या आर्थिक विकास महामंडळ व शासकीय संस्थांना भरीव निधीची तरतूद करून खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय साधण्याचे काम अर्थसंकल्पात केले आहे", धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
प्रफुल पटेल काय म्हणाले...
"महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित प्रगतीशील अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल महायुती सरकार आणि राज्याचे अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांचे अभिनंदन. अधिकाधिक पायाभूत सुविधा, आणि सर्व घटकांच्या विकासाचे लक्ष्य समोर ठेवून हा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब व पिछडलेल्या वर्गातील घटकांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी भविष्यातील सर्वसमावेशक विकासाची नांदी ठरणार आहेत," अशा शब्दांत प्रफुल पटेल यांनी बजेटचे कौतुक केले.
महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित प्रगतीशील अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल महायुती सरकार आणि राज्याचे अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांचे अभिनंदन. अधिकाधिक पायाभूत सुविधा, आणि सर्व घटकांच्या विकासाचे लक्ष्य समोर ठेवून हा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब व…
— Praful Patel (@praful_patel) February 27, 2024