मुंबई - राज्याचा २०२२-२३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री अजित पवार हे आज विधानसभेत सादर करत आहेत. या अर्थसंकल्पामधून राज्य सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये देण्याची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा करताना अजित पवार म्हणाले की, नियमितपणे कर्जफेक करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा २०२० मध्ये करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. मात्र आता २०२२-२३ च्या आर्थिक वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. याचा फायदा राज्यातील तब्बल २० लाख शेतकऱ्यांना होणार असून, त्यासाठी १० हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या घोषणा- नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान- १ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे क्षेत्र - ६० हजार कृषीपंपांना वीजजोडणी देणार- पीक कर्ज वाटपात वाढ करणार - येत्या दोन वर्षात १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार- कोकण आणि परभणी विद्यापीठाला ५० कोटी रुपये देण्यात येणार