मुंबई - आज जाहीर करण्यात आलेला राज्याचा अर्थसंकल्प आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्याचा प्रकार आहे! मागच्या अर्थसंकल्पात तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी मांडलेल्या विकासाच्या पंचसुत्रीची 'पंचामृत' या गोड नावाखाली केलेली नक्कल आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कांदा-कापूस, हरभरा, धान उत्पादक शेतकरी अडचणीत असताना, शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या घडत असताना त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही, याबद्दल धनंजय मुंडे यांनी चिंता व्यक्त केली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल करून सरकारने स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना घोषित केल्याबद्दल राज्य सरकारचे मुंडेंनी आभार मानले, मात्र यामध्ये अपघातात शेतकऱ्याला कायमचे अपंगत्व आल्यास किमान 5 लाख व मृत्यू झाल्यास किमान 10 लाखांची मदत देण्याची मागणी होती, ती देखील पूर्ण झाली नसल्याचे धनंजय मुंडे यांनी नमूद केले.
राज्यात जवळपास सहा नवीन महामंडळे उभारून त्यांना प्रत्येकी 50 कोटींची घोषणा करण्यात आली आहे. हे 50 कोटी त्या महामंडळाच्या आस्थापना खर्चासाठी सुद्धा पुरणार नाहीत, मग केवळ आगामी निवडणुकीत विभिन्न समाजातील नागरिकांना आकर्षित करण्यासाठी या घोषणा करण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला उभारी देणाऱ्या स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न असलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचा सरकारला या अर्थसंकल्पात विसर पडला, हे दुर्दैवी आहे, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
या अर्थसंकल्पाचे वाचन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगासह सर्वच 5 ज्योतिर्लिंग स्थळांचे संवर्धन करण्यासाठी 300 कोटी रुपयांची घोषणा केली. परळी येथील श्री वैद्यनाथ प्रभूंसह राज्यातील सर्व ज्योतिर्लिंगे रेकॉर्डवर आणल्याबद्दल देखील धनंजय मुंडे यांनी सरकारचे आभार मानले आहेत.