लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने झाली. गोंधळात राज्यपालांनी दोन मिनिटांत भाषण संपविले पण ते पटलावर ठेवण्यात आल्याने नियमांनुसार कामकाजाचा भाग बनले. या भाषणात राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारची विविध मुद्द्यांवर मुक्तकंठाने प्रशंसा केली.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनामार्फत अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. या उपाययोजनांची सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय व जागतिक आरोग्य संघटना या स्तरांवर दखल घेण्यात आली. या संबंधात मुंबई शहर हे अन्य शहरांसाठी पथदर्शक शहर ठरले. या कठीण काळात राज्य शासनाने समाजातील दुर्बल घटकांचे दु:ख कमी करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. राज्यातील जनतेला आर्थिक लाभ व अन्न सुरक्षा देणाऱ्या योजनांवर विशेष भर देण्यात आला, असे गौरवोद्गार कोश्यारी यांनी काढले. राज्य शासनाने आर्थिक चणचण असूनदेखील आर्थिक कार्ये पुन्हा सुरू करण्याची व्यवस्था केली, औद्योगिक गुंतवणूक आकर्षित केली आणि त्याचवेळी पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेतला, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना अर्थसहाय्य, महापूरग्रस्तांना अर्थसहाय्य, सातबारा उतारा नि:शुल्क देण्याची सुरुवात, मराठीच्या वापरासाठी राज्य सरकारने धरलेला आग्रह यासह विविध कल्याणकारी निर्णयांबद्दलही त्यांनी सरकारचे कौतुक केले.
सीमाप्रश्न, बंगळुरूतील घटनेवरून कर्नाटक सरकारचा निषेध
महाराष्ट्राच्या सीमाभागातील मराठी भाषिक जनतेच्या हक्कांसाठी उभे राहण्याचा माझ्या सरकारचा निर्धार आहे. १६ डिसेंबर २०२१ रोजी बंगळुरूमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा आणि बेळगावमधील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाई फेकल्याच्या कृत्याचा माझे शासन तीव्र निषेध करत आहे. विवादग्रस्त सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक शासनाने केलेली दडपशाहीची कृत्ये निंदनीय आहेत, असे राज्यपाल म्हणाले.