Maharashtra Budget Session : 1 एप्रिलला शिंदे-फडणवीस शॉक देणार, अर्थसंकल्पानंतर सांगतील; अजित पवारांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 03:57 PM2023-03-09T15:57:31+5:302023-03-09T15:57:42+5:30
'अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला. अर्थसंकल्पात वास्तावाचं भान नाही, केवळ घोषणांचा सुकाळ.'
मुंबई - आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसह महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. दरम्यान, अर्थसंकल्पानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी या अर्थसंकल्पाला 'चुनावी जुमला' म्हटले.
अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला
'चुनावी जुमला असतो ना...तसाच हा अर्थसंकल्प आहे. दूरदृष्टीचा अभाव अन् वास्तवाचे भान नसलेला अर्थसंकल्प आहे. स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आहे. राज्याची काय परिस्थिती आहे, उत्पन्न आणि खर्च किती आहे, ते पाहायाल हवं होतं. आज संत तुकाराम महाराजांच्या देहूमध्ये भरीव मदत करतील, अशी अपेक्षा होती, पण झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सभागृहात घोषणा सुरू होत्या, पण पंतप्रधानांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन झालेल्या स्मारकाबद्दल काहीच घोषणा नाही. फक्त लोकांना बरं वाटण्यासाठी सरकारने घोषणा केल्या,' अशी टीका अजित पवारांनी केली.
फक्त घोषणा देण्याचे काम केले
ते पुढे म्हणतात, 'गेल्यावेळेस मी अर्थसंकल्प सादर केला होता, त्यात आम्ही पंचसूत्री कार्यक्रम आणला होता, तर यांनी पंचामृत आणला. मूळात अमृत कुणीच बिघतलं नाही. तशाच प्रकारे हे विकासाचे पंचामृत आहे, ते कधीच दिसणार नाही. जनतेला स्वप्नांच्या दुनियेत फिरवून आणण्याचा प्रयत्न झालाय. त्यांनी 2014 मध्ये केलेल्या घोषणांची आज काय अवस्था आहे? राज्यातील उद्योग इतर राज्यात जातायेत, निधी योग्यरित्या खर्च होत नाहीये. यांनी फक्त घोषणा देण्याचे काम केले आहे,' अशी टीकाही त्यांनी केली.
1 एप्रिलला जनतेला झटका बसणार
'अर्थसंकल्पात अनेक महामंडळाची नावे घेतली, पण त्यांना किती निधी देणार हे सांगितलं नाही. कुठल्याही बाबतीत ठोस किती निधी दिला, याबद्दल काहीच माहिती दिली गेली नाही. गेल्यावेळेस आमच्या अर्थसंकल्पात ज्या गोष्टी होत्या, त्यातील अनेक गोष्टी यांनी रिपीट केल्या आहेत. 1 एप्रिलला जनतेला मोठा झटका बसणार. 30-35 टक्के विज दरवाढ होणार. त्यांनी अर्थसंकल्पात सांगितलं नाही, पण नंतर सांगतील. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करण्यापेक्षा त्यांच्या पिकांना योग्य भाव द्या. महिलांबाबात मोठी घोषणा होईल अशी अपेक्षा होती, पण घोषणा झाली नाही. फक्त भरिव तरतूद करणार असं म्हणतात, पण भरिव म्हणजे किती करणार स्पष्ट करा,' असंही अजित पवार म्हणाले.