मुंबई - आम्ही पारदर्शी कारभार केला म्हणून आरशासमोर उभं राहू. तुमच्या घरगडींना ईडी बोलावतेय म्हणून ईडीला घरगडी म्हणता का? पोलिसांकडून आमच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करतायेत. मग आम्ही पोलिसांना घरगडी म्हणायचं का? हे कुणीच घोषित करू नये उद्या कोण आणि परवा कोण? मग ही अक्कल संजय राऊतांनाही देणार का? अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.
देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, तुम्ही म्हणता आमच्यावर टीका करा, महाराष्ट्रावर नाही. महाराष्ट्रावर टीका कोण करतंय? तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही. हा सभ्रम मनातून काढून टाका. जे मुद्दे आम्ही मांडले त्याला एकही उत्तर दिले नाही. आम्ही जे आरोप मांडले ते पुराव्यासकट मांडले आहेत. त्यावर उत्तर नसल्याने असं भाषण दिले. तुमचा त्रास आमच्या लक्षात येतोय. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) दिले नाही. हे भाषण विधानसभेतलं होतं. पण शिवाजी पार्कचं भाषण झालं. त्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध म्हणून सभात्याग करतो असं त्यांनी सांगत अजितदादा ७२ तास तुम्ही आमच्यासोबत होता. मुख्यमंत्री बसल्याबरोबरच तुम्ही उपयोग काय झाला असं विधान केले म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर दादा तुम्हीच उत्तर दिलं असा टोला लगावला.
तसेच मेहबुबा मुफ्तीसोबत गेल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात. अफजल गुरूला फाशी देऊ नका असं पत्र देणारे आज तुमच्यासोबत बसलेत. मेहबुबा मुफ्तीसंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, आयएसएने सांगितले होते काश्मीरात निवडणुका होऊ देणार नाही. तेव्हा ६० टक्के मतदानासह निवडणुका घेऊन दाखवल्या. ज्यावेळेस फुटिरतावाद्यांनी निवडणुका झाल्या तरी सरकार बनू देणार नाही असं आव्हान दिले. तेव्हा देशाची आवश्यकता होती म्हणून भाजपा मेहबुबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये गेली. परंतु आम्ही जेव्हा निवडणुका होऊ शकतात हे दाखवून दिले तेव्हा दुसऱ्या क्षणाला सत्तेला लाथ मारली असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.
नवाब मलिकांचं समर्थन करताय त्याचे दु:ख
मराठी शाळा बंद झाल्या त्याबद्दल बोलले नाही. कोविड काळात सर्वात जास्त रुग्ण आणि मृत्यू झाले त्यावर काही बोलले नाहीत. बाकी जाऊ द्या. नवाब मलिकांचे समर्थन उद्धव ठाकरे करतायेत त्याचे मनातून दु:खं आहे. नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केली. जो आरोपी आजही जेलमध्ये आहे. खोट्या कागदपत्राच्या आधारे दहशतवाद्याशी व्यवहार करतायेत. ते पैसे हसीना पारकरला चाललेत. या गोष्टींचे समर्थन ते करतात. त्याचे अतिशय दु:ख आहे असा चिमटा देवेंद्र फडणवीसांनी काढला.