मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब काल मुंबई पोलिसांनी नोंदवला. याचे पडसाद आज विधानसभेत पाहायला मिळाले. फडणवीस यांची चौकशी झाली नाही, तर त्यांचा जबाब नोंदवण्यात आला, असं स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिलं. प्रश्नावलीतील प्रश्न साक्षीदारासाठीचे होते. पण मला काल जे प्रश्न विचारले गेले, ते मात्र आरोपीसाठीचे होते, असा दावा फडणवीसांनी केला.
या प्रकरणात मी विशेषाधिकार वापरणार नाही, असं मी आधीच सांगितलं होतं. मी पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवायला तयार होतो. पण पोलिसांनीच आम्ही तुमच्या घरी येऊन जबाब नोंदवू असं सांगितलं. त्याप्रमाणे काल त्यांनी माझा जबाब नोंदवला, अशी माहिती फडणवीसांनी सभागृहाला दिली. मात्र प्रश्नावलीतील प्रश्न आणि काल विचारलेले गेलेले प्रश्न यामध्ये गुणात्मक फरक असल्याचं फडणवीस म्हणाले.
मला प्रश्नावली पाठवली गेली आणि याबद्दल तुमचा जबाब नोंदवायचा असल्याचं सांगितलं गेलं. पण प्रश्नावलीतील प्रश्न आणि काल विचारलेले प्रश्न यात फरक आहे. प्रश्नावतीलील प्रश्नांचं स्वरुन साक्षीदाराला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसारखं होतं. पण काल जे प्रश्न मला पोलिसांनी विचारले, ते एखाद्या गुन्हेगाराला विचारले जातात, त्या स्वरुपाचे होते, असं फडणवीसांनी म्हटलं.
प्रश्नावलीतील प्रश्न आणि कालचे प्रश्न वेगळे होते. याचा अर्थ ते कोणीतरी जाणीवपूर्वक बदलले. तुम्ही ऑफिशियल सीक्रेट ऍक्टचा भंग केला आहे का, असा प्रश्न मला विचारला गेला. अशा प्रकारचे आणखी ४-५ प्रश्न विचारले गेले. मला आरोपी, सहआरोपी करण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक प्रश्न बदलले आहेत. ते कोणी बदलले याचीही मला कल्पना आहे. या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. प्रश्न कुठे बदलले गेले, कोणी बदलले याची माहिती माझ्याकडे आहे. मी कायदेशीर लढा सुरूच ठेवेन, असं फडणवीस म्हणाले.
मी कोणत्या कुटुंबातून याची माहिती कदाचित विरोधकांना नाही. माझ्या वडिलांना त्यांनी कोणताही गुन्हा केला नसताना इंदिरा गांधींनी २ वर्षे तुरुंगात ठेवलं होतं. माझ्या काकूंना १८ महिन्यांचा तुरुंगवास झाला होता. अशा कुटुंबातून मी येतो. त्यामुळे घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. माझा लढा सुरूच राहील, असं फडणवीसांनी सांगितलं.