मुंबई – दाऊद आहे कुठे? आधी रामाच्या नावाने मतं मागितली आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का? दाऊदला फरफटत आणू असं गोपीनाथ मुंडे म्हणाले होते. पण आता आपणच दाऊदच्या मागे फरफटत चाललोय. ओबामाने ओसामाच्या नावाने मतं मागितली का? ओबामांनी घरात घुसून लादेनला मारलं. दाऊदच्या घरात घुसून त्याला मारणं याला हिंमत म्हणतात असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीभाजपाला(BJP) लगावला आहे.
उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले की, देशद्रोह्यांच्या विरोधात आम्ही आहोतच परंतु नवाब मलिकांचा राजीनामा तुम्ही मागता? पण काश्मीरात मेहबुबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये तुम्ही बसला होता. ज्याने लोकसभेवर हल्ला केला त्या अफजल गुरूला फाशी देऊ नका असं मुफ्ती म्हणाल्या होत्या. या विचारांची माणसं तुम्हाला माहिती असताना तुम्ही त्यांच्यासोबत सरकारमध्ये बसला. मी कडवट हिंदुत्ववादी आहे आणि राहणार, माझे विचार बदलले नाही. सत्तेसाठी मी बदलणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितले.
तसेच मुझफ्फर लांबेचा माहिमच्या दर्ग्यातील अनेक क्रांतीकारकांसोबत फोटो हवा. माझा फोटो कुणासोबत दाखवला म्हणजे तो आपल्या संबंधीचा आहे असं होत नाही. मुझफ्फर लांबे यांच्या नियुक्ती तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात केली आहे. नुसता आरोप करून राज्य चालू शकत नाही. एखाद्याला वाईट आहे हे सांगण्याआधी तू किती चांगला आहे हे सांगावं लागते. दुसऱ्यांवर आरोप करताना स्वत: काय केले हे पण पाहावं लागते असंही उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावलं.
ईडी आहे की घरगडी?
बदनामी करताना कुठल्या थराला जातायेत. नवाब मलिकांवर(Nawab Malik) आरोप झाले. सिद्ध झाल्यावर बघू काय करायचे. पण तुम्ही ज्याप्रकारे आरोप करतायेत नवाब मलिकचा दाऊदचा हस्तक असल्याचं प्रतिमा मलिन करायची. केंद्राच्या यंत्रणांना थाळ्या वाजवा, दिवे लावा हेच करता येते का? इतकी वर्ष मलिक निवडून येत होते. तेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांना हे दिसलं नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांना काहीच माहिती नाही का? माहिती तुम्हीच द्यायची, चौकशी तुम्हीच करायची मग ईडी करतंय का? ईडी आहे की घरगडी हेच कळत नाही. सगळ्या यंत्रणांचा गैरवापर केला जातो. पण आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिकांच्या पाठीशी ठाम असल्याचं दाखवून दिलं.