राच्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी किती असेल याबाबत शक्यता वर्तवण्यात येत होत्या. परंतु सध्या १ मार्च ते ८ मार्च या पहिल्या आठवड्याचं कामकाज ठरवण्यात आलं असून गुरूवारी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. २५ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर पुन्हा निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, ८ मार्च रोजी राज्याच्या अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.यापूर्वी ठरलेला तीन आठवड्यांचा कार्यक्रम आजच्या बैठकीत मांडण्यात आला. अधिवेशनाचे कामकाज कसे चालेल यावरदेखील चर्चा करण्यात आली. २५ तारखेला पुन्हा बैठक होईल आणि त्यानंतर पुढील बैठक घेण्यात येणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. दरम्यान, राज्यपालांनी जशी अर्थसंकल्पीय अधिवशनाबाबत काळजी दाखवली तशी त्यांनी विधानसभेच्या १२ रिक्त जागांबाबतही दाखवावी. अधिवेशनापूर्वी त्यांनी याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी १ मार्च ते ८ मार्च या कालावधीतील कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली असून २५ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतरच पुन्हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं सरकारी पक्षाच्या वतीनं सांगण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले. "ज्या काही चर्चा झाल्या त्यातून फार काळ अधिवेशन चालवण्याची मानसिकता सरकारची दिसत नाही. सध्या प्रत्येक आठवड्याला आपण कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊ असं सांगण्यात आलं. कामकाज कसं ठरवायचं याबाबत पुन्हा २५ फेब्रुवारी रोजी बैठक बोलावू असं सांगण्यात आलं," अशी माहिती फडणवीस यांनी दिली."कामकाज सल्लागार समितीच्या बैठका भरपूर होणार आहेत. परंतु कामकाज किती होईल याबाबत मनात साशंकता आहे," असं फडणवीस म्हणाले. सध्या १ मार्च ते ८ मार्च या कालावधीतील कार्यक्रम समोर ठेवला आहे. त्याच्या पुढील कार्यक्रम कसा करायचा याची बैठक आठवड्याच्या अखेरीस तर १ तारखेपासून काम कसं करायचं याची बैठक २५ फेब्रुवारी रोजी होईल. नेमकी यामागची मानसिकता काय हे माहित नसल्याचंही त्यांनी सांगितलं.चार आठवड्यांचं अधिवेशन हवंकोरोनाची आकडेवारी अधिवेशनामुळे वाढतायत अस म्हणणार नाही. लोकसभेचं अधिवेशन कोरोनाच्या काळात नीट चालतंय, पहिला टप्पा पूर्ण केला, दुसरा टप्पाही पूर्ण करणारेत. अधिवेशनाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न समोर येत असतात, उपाययोजना होत असतात. वीजेच्या संदर्भातील परिस्थिती बिकट आहे. ७५ लाख लोकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. राज्याच्या इतिहासात अशी परिस्थिती पाहिली नाही. त्यामुळे हे प्रश्न मांडायचे कुठे. पूर्ण चार आठवड्यांचं अधिवेशन केलं पाहिजे अशी आमची मागणी असल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चपासून; २५ फेब्रुवारीला परिस्थितीचा आढावा घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 5:10 PM
Maharashtra Budget Session 2021 : १ मार्चपासून अर्थसंल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार, चार आठवड्यांचंच अधिवेशन व्हावं अशी विरोधकांची मागणी
ठळक मुद्देचार आठवड्यांचंच अधिवेशन व्हावं अशी विरोधकांची मागणी २५ फेब्रुवारीला परिस्थितीचा आढावा घेणार