मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यात यंदाच्या अधिवेशनात शिंदे-ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंच्या खास माणसाकडून मोठी चूक घडली आहे.
अधिवेशन काळात सुरक्षा रक्षकांकडून चोख बंदोबस्त असतो. त्यात सभागृहात केवळ आमदारांना प्रवेश दिला जातो. मात्र असे असताना उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि विश्वासू मिलिंद नार्वेकर हे सभागृहात बसल्याचं पाहायला मिळाले. राज्यपालांचे अभिभाषण सुरू असताना नार्वेकर सभागृहात बसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. मात्र आदित्य ठाकरेंच्या ही चूक निदर्शनास यांनी मिलिंद नार्वेकरांना लक्षात आणून दिले. त्यानंतर मिलिंद नार्वेकर हे सभागृहाबाहेर गेले.
अधिवेशन सुरु असताना सुरक्षा रक्षकांनी सभागृहात मिलिंद नार्वेकरांना सोडले कसे हा प्रश्न तयार होतो. मात्र ही प्रेक्षक गॅलरी आहे असं समजून आपल्याकडून चुकीने हे कृत्य घडले असं स्पष्टीकरण मिलिंद नार्वेकरांनी दिले.
कोण आहेत मिलिंद नार्वेकर?५५ वर्षीय मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे खासगी स्वीय सहाय्यक आहेत. २०१८ मध्ये शिवसेना सचिवपदी नार्वेकरांची नियुक्ती करण्यात आली. १९९४ पासून मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबत आहेत. ठाकरे आणि नेते, कार्यकर्ते यांच्यातील दुवा म्हणून ते काम करतात. उद्धव ठाकरेंच्या राजकीय दौऱ्यापासून ते प्रत्येक कामात मिलिंद नार्वेकर भूमिका निभावतात.
१९९० मध्ये शाखाप्रमुखपदासाठी मुलाखत देण्यासाठी ते मातोश्रीत पोहचले होते. तेव्हा त्यांच्या स्वभाव गुणांनी प्रभावित होऊन उद्धव ठाकरेंनी शाखाप्रमुखऐवजी त्यांना खासगी स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्त केले. कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीशिवाय नार्वेकरांनी राजकारणात प्रवेश केला होता. २०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीत मिलिंद नार्वेकरही शिवसेना सोडून शिंदे गटात सहभागी होतील अशी चर्चा होती. परंतु अद्याप मिलिंद नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.