मुंबई: पोलीस आणि विशेष सरकारी वकिलांच्या माध्यमातून विरोधकांना संपवण्याचा कट सरकार आखत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी एकच खळबळ उडवून दिली. आपल्याकडे यासंदर्भात तब्बल १२५ तासांचं व्हिडीओ रेकॉर्डिंग असल्याचं म्हणत फडणवीसांनी पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. फडणवीसांनी टाकलेल्या या पेन ड्राईव्ह बॉम्बची सगळीकडेच चर्चा झाली. यानंतर आज विधानसभेत मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे खाणाखुणा करताना दिसले.
विधानसभेत मंत्री जयंत पाटील बोलत असताना त्यांच्या मागे धनंजय मुंडे बसले होते. विरोधकांच्या दिशेनं पाहत त्यांच्या खाणाखुणा सुरू होत्या. त्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्या. आज कोणता बॉम्ब, अशी विचारणा मुंडे करत होते. कुठे आहे बॉम्ब? आज फुटणार आहे का बॉम्ब? असे प्रश्न खुणा करून मुंडे विचारत होते. त्यानंतर मुंडे यांनी विरोधकांच्या दिशेनं पाहत दंड थोपटले. येऊ द्या, तयार आहे, असं मुंडेंनी खुणा करत विरोधकांना सांगितलं.
फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्बगेल्या आठवड्यात विधानसभेत बोलताना फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. विरोधकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकण्यासाठी पोलीस आणि सरकारी वकिलांकडून कट रचण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. धाडी टाकणाऱ्यांना विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आदेश दिले. त्यासाठी खोटे पंच, खोटे साक्षीदार उभे करण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
गिरीश महाजन, संजय कुटे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मला अडचणीत आणण्यासाठी कट रचण्यात आले. त्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी सगळे आदेश दिले. धाडी कशा टाकायच्या, चाकू कसे ठेवायचे, मोक्का कसा लावायचा, यासंदर्भात सगळ्या सूचना चव्हाण यांनी दिल्या. सरकारच्या मदतीनं हे कारस्थान शिजलं, असे धक्कादायक आरोप फडणवीस यांनी केले.
खोट्या तक्रारी करून खोटे साक्षीदार उभे करून विरोधकांना गोत्यात आणण्यासाठी कुभांड रचलं गेलं. विशेष सरकारी वकिलाच्या कार्यालयात विरोधकांच्या विरोधात कट शिजवण्यात आला. या प्रकरणात एफआयआर सरकारी वकिलांनीच लिहून दिला आणि साक्षीदारही दिला. या सगळ्या संभाषणांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. तब्बल सव्वाशे तासांचं फुटेज आहे. त्यावर २५ ते ३० भागांची वेब सीरिज निघेल आणि हे सगळं सत्य घटनेवर आधारित आहे, असा दावा फडणवीसांनी केला.