राम सातपुतेंकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; अजित पवार म्हणाले- 'तुमचेही वरिष्ठ नेते आहेत...'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 03:35 PM2023-03-02T15:35:14+5:302023-03-02T15:36:26+5:30
भाजप आमदार राम सातपुतेंकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख आल्यानंतर विरोधकांनी माफीची मागणी केली.
मुंबई: आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवसही मोठ्या गदारोळात गेला. आधीच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद सुरू असताना, भाजप आमदार राम सातपुते यांच्या एका वक्तव्याने दुसरा वाद निर्माण झाला. यावेळी सभागृहात बोलत असताना राम सातपुते यांच्या तोंडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख निघाला. यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला. अजित पवारांनीही राम सातपुते यांच्या माफीची मागणी केली. अकेर सातपुते यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने वाद मिटला.
काय म्हणाले राम सातपुते?
सभागृहात बोलत असताना राम सातपुते म्हणाले की, 'जितेंद्र आव्हाड मला दलित आमदार म्हणून हिनवत आहेत. हो मी दलित आहे, मी हिंदू दलित आहे. माझ्या बापाने चपला शिवल्या, त्याचा मला अभिमान आहे. मी सनातन हिंदू धर्मात जन्म घेतलाय, त्याचा मला अभिमान आहे. मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं म्हणून मी आमदार आहे. मला यांच्या पक्षाच्या शरद पवारने आरक्षण दिलं नाही,' असा उल्लेख सातपुते यांनी केला.
यानंतर अजित पवार म्हणाले, 'प्रत्येकाला आपल्या वरिष्ठ नेत्याचा अभिमान असतो. मी अनेक वर्षांपासून सभागृहात येतो, असे प्रसंग अनेकदा येतात. एकेरी उल्लेक झाला असेल, तर नवीन पायंडे पडतील. सत्ताधाऱ्यांच्या पक्षाचेही वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल कोणी काही बोललं तर शब्दाने शब्द वाढततील. त्यामुळे राम सातपुते यांनी तात्काळ माफी मागून विषय संपवावा. मी स्वतः विरोधी पक्षनेता असतानाही अनेकदा माफी मागितली आहे. त्यामुळे कुणाचाही अपमान व्हायचे काम नाही,' असं अजित पवार म्हणाले.
यानंतर राम सातपुते यांनी दिलगीरी व्यक्त केली. 'मी पहिल्यांदाच आमदार झालोय. बोलण्याच्या ओघातून माझ्या मी बोलून गेलो. सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो,' असं राम सातपुते म्हणाले. त्यांच्या दिलगिरीनंतर या वादावर पडदा पडला.