मुंबई – गेल्या काही दिवसांत राज्यात सुरू असलेल्या ईडी कारवाईविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ठाकरे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांवर सभागृहात त्यांनी सडेतोड उत्तर दिले. प्रतिमा मलिन करणे आणि बदनामी करणे हे कुठल्या थराला जाऊन करणार आहात. हा धुतराष्ट्र नाही छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. या वाटेला जावू नका. त्यातून कुणाचंही भले होणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी सभागृहात दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले की, मी घाबरलोय म्हणून असं बोलत नाही. जे काही मतभेद असतील तर सांगा, पण बदनामी करू नका. सत्ता मिळवण्यासाठी कुटुंबावर तणाव आणू नका. मी तुमच्यासोबत येतो. टाका मला तुरुंगात...कुटुंबाची बदनामी आम्ही कधीच केली नाही. तुमच्या सवडीनं आरोप गोळा करा. पेनड्राइव्ह आणण्यापेक्षा मला तुरुंगात टाका, मी तयार आहे. तुरुंग कोणता तर कृष्ण जन्मभूमीचा तुरुंग असेल त्यात टाका. मी कृष्ण नाही तसं तुम्ही कंस नाही. बाळासाहेबांनी तुमच्या नेत्यांना वाचवलं मग त्यांच्याकडे जाऊन काय उत्तर देणार? २०१४ मध्ये युती तुम्ही तोडली. मी तेव्हाही हिंदु होता. तुरूंगात टाकणार असाल मला टाका, सगळ्यांची जबाबदारी मी घेतो. १९९३ मध्ये ज्या शिवसैनिकांनी मुंबई वाचवली, हिंदूंना वाचवलं. तेव्हा अनिल परब यांना रस्त्यावर मारहाण झाली होती. त्यांचा बंगला तोडणार का? राज्यात अघोषित आणीबाणी लादली असल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच हर्षवर्धन पाटील यांना झोप लागत नव्हती मग त्यांनी झोप लागायचं औषध घेतले. भाजपाकडे असं कोणतं झोपेचे औषध आहे. आम्ही दाऊदची माणसं, भ्रष्टाचारी असं म्हणता. पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसला असता ना? केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून अंगावर काय येता? हा नामर्दपणा आहे. हिंमत असेल समोर या, घरच्यांवर कसले आरोप करता? महाभारतातील शिखंडी होता त्यासारखं कशाला काम करता? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला(BJP) विचारला आहे.