मुंबई - मागील ३५ दिवसांपासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा अखेर आज पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारातभाजपाचे ९ आणि शिंदे गटाच्या ९ जणांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शपथ दिली. मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा राज्य पावसाळी अधिवेशन पूर्ण झाल्यानंतर करण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
आज झालेल्या विस्तारात भाजपाकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली. तर शिंदे गटाकडून उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
शिक्षण किती? नव्या मंत्रिमंडळात एक मंत्री १० वी पास, ५ मंत्री १२ वी पास, एक इंजिनिअर, ७ पदवीधर आणि २ मंत्री पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री घेतलेले आहेत. तर एकाने डॉक्टरेट मिळवली आहे. भाजपाचे मिरजचे आमदार सुरेश खाडे सर्वात उच्चशिक्षित आहेत. १८ मंत्र्यांपैकी ७० टक्के मंत्र्यांवर राजकीय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे खटले आहेत. १२ मंत्र्यांविरोधात गुन्हे नोंद आहेत.
संपत्ती किती?शिंदे-फडणवीस सरकारमधील सर्व मंत्री कोट्यधीश आहेत. मुंबईतील मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे. व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असलेल्या लोढा यांच्याकडे ४४१ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. लोढा यांच्याकडे २५२ कोटी रुपयांची जंगम आणि १८९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय त्याच्याकडे १४ लाख रुपयांची जग्वार कार आणि शेअर बाजारात काही गुंतवणूक आहे. लोढा यांचे दक्षिण मुंबईतही ५ फ्लॅट आहेत. लोढा यांच्यावरही पाच गुन्हे दाखल आहेत.
२ कोटींची संपत्ती असलेले संदीपान भुमरे हे मंत्रिमंडळातील सर्वात गरीब मंत्री आहेत. ते पैठणचे आमदार आहेत. गेली ३५ वर्षे शिवसेनेत कार्यरत होते. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर ते उद्धव ठाकरेंच्या गटातून बाहेर पडले. तानाजी सावंत हे मंगलप्रभात लोढा यांच्यानंतर मंत्रिमंडळातील दुसरे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. त्यांच्याकडे ११५ कोटींची संपत्ती आहे. तानाजी सावंत आधी राष्ट्रवादीत होते, नंतर शिवसेनेत आले. आता शिंदे गटात आहेत. तिसरे श्रीमंत मंत्री शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आहेत. तेही राष्ट्रवादीतून शिवसेनेत आणि आता ठाकरेंकडून शिंदे गटापर्यंत पोहोचले आहेत. त्यांची संपत्ती ८२ कोटी आहे. सदर बातमी टीव्ही ९ नं दिली आहे.
बाकी सर्व मंत्र्यांबद्दल बोलायचे झाल्यास, विजय गावित (भाजप) यांच्याकडे २७ कोटी, गिरीश महाजन (भाजप) यांच्याकडे २५ कोटी, राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) यांच्याकडे २४ कोटी, अतुल सावे (भाजप) यांच्याकडे २२ कोटी आहेत. तसेच अब्दुल सत्तार (शिंदे गट) यांच्याकडे २० कोटी, शंभूराज देसाई (शिंदे गट) १४ कोटी, सुधीर मुनगंटीवार (भाजप) ११.४ कोटी, दादा भुसे (शिंदे गट) यांच्याकडे १० कोटींची मालमत्ता आहे.