मुंबई : जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आपल्या राज्य मंत्रिमंडळात असून ही एक ‘बेस्ट टीम’ आहे,अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्या वहिल्या मंत्री परिषदेत आपल्या भावना व्यक्त केली. तसेच भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३४ मधील अनुसूचित जाती-जमातीच्या संदर्भातील राखीव जागांबाबत समर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन ८ जानेवारी २०२० रोजी बोलवावे, असा मंत्री परिषदेच्या बैठकीत निर्णय झाल्याचेही ते म्हणाले.राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रारंभी सर्वांचे स्वागत करताना मुख्यमंत्री म्हणाले, याठिकाणी भिन्न भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले असले तरी आपण जनतेतून निवडून आलेले असल्याने त्यांचे प्रश्न सोडविणे यावर सगळे एक आहोत. एक कुटुंब म्हणून याठिकाणी आपणास काम करायचे असून एखाद्या विषयावर वेगवेगळी भूमिका जरी असली तरी राज्यासाठी हिताचे काय त्याचाच विचार आपल्याला करायचा आहे. आपली ही बेस्ट टीम प्रत्येक सामना जिंकेलच आणि राज्याला अधिक प्रगतीपथावर पोहोचवेल असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. तर आपण सर्वजण एकदिलाने काम करू, असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला.
Maharashtra Cabinet Expansion: 'प्रश्नांची चांगली जाण असलेली ‘बेस्ट टीम’'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 3:08 AM