Maharashtra Cabinet Expansion: अस्लम शेख यांच्या मंत्रिपदावरून पक्षात असंतोष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 03:41 AM2019-12-31T03:41:56+5:302019-12-31T03:43:04+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मालाड पश्चिमचे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांना मुंबईतील अल्पसंख्याक चेहरा म्हणून संधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मालाड पश्चिमचे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांना मुंबईतील अल्पसंख्याक चेहरा म्हणून संधी मिळाली आहे. त्यांना मंत्रिपद मिळाल्याने काँग्रेस पक्षात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवाय, याकूब मेमनला फाशी देऊ नये यासाठी सही करणाऱ्यांपैकी एक असलेल्या शेख यांना ठाकरे मंत्रिमंडळात कसे स्थान मिळाले, असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात याकूब मेमनला फाशीची शिक्षा जाहीर झाली. त्यावेळी अस्लम शेख यांनी २८ जुलै २०१५ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना याकूब मेमनला फाशी न देता जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी विनंती करणारे पत्र लिहिले होते. त्यावरून आता वाद सुरू झाला आहे.
मुंबादेवी मतदारसंघाचे काँग्रेसचे २००४ पासून सलग तिसऱ्यांदा निवडून येणारे आमदार अमीन पटेल यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची जोरदार चर्चा होती. त्याऐवजी शेख यांचा समावेश झाल्याने नाराज गट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटणार असल्याचे समजते.
गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अस्लम शेख भाजप किंवा शिवसेनेत जाणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र भाजपमध्ये त्यांना प्रवेश व तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अखेर दिल्ली दरबारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि काँग्रेसचे तिकीट मिळवले होते.
काँग्रेसच्या चौथ्या यादीत त्यांना मालाड येथून तिकीट दिल्याची घोषणा पक्षाने केली. त्यांनी महायुतीचे उमेदवार रमेशसिंग ठाकूर यांचा सुमारे १० हजार मतांनी पराभव केला. आमदार शेख हे १९९७ ते २००२ या काळात समाजवादी पार्टीकडून, तर २००२-२००७ या काळात काँग्रेसकडून नगरसेवक होते. २००९, २०१४ आणि आता २०१९मध्ये ते मालाड पश्चिममधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले.