मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय नेत्यांच्या वारसदारांना संधी मिळाल्याने दिसून येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाल्याने इतिहासात पहिल्यांदाच एका मंत्रीमंडळात बाप-लेक दिसणार आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणात विशिष्ठ राजकीय घराण्यांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहेत. तीच परंपरा पुढेही चालू आहे. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेले अनेक तरुण चेहरे हे अशाच घराण्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला आहे. ते सलग तीन वेळा लातूर (शहर) मतदारसंघातून निवडून आले असून यापूर्वी अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. माजी मंत्री स्व. पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव सतेज उर्फ बंटी पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. श्रीवर्धन मतदारसंघातून त्या पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. काँग्रेसचे ज्येषठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांना दुसऱ्यांदा मंत्रीपद मिळाले आहे. यापूर्वी त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. यावेळी त्यांना कॅबिनेटमध्ये बढती मिळाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव प्राजक्त तनपुरे, तसेच यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव शंकरराव गडाख यांनाही संधी मिळाली आहे. हे दोन्ही युवा नेते अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. प्राजक्र तनपुरे हे जयंत पाटील यांचे नातलग आहेत.भाजप नेते राधाकृष्ण विखे यांची तिहेरी कोंडीकाँग्रेसचे माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या तिकीटावर ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर आता त्यांची अहमदनगर जिल्ह्यात तिहेरी कोंडी केली गेली आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे आणि शिवसेनेकडून शंकरराव गडाख या तीन नेत्यांना मंत्रीपदे दिली गेली आहेत. त्यामुळे विखेंची गडाख-थोरात-तनपुरे यांनी मोठी राजकीय कोंडी केली आहे.१३ जिल्हे राहिले मंत्रिपदापासून ‘वंचित’महाविकास आघाडी सरकारमध्ये विदर्भासह सर्व विभागांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न झाला असला तरी राज्यातील बारा जिल्हे मंत्रिपदापासून वंचित राहिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख असे दोन कॅबिनेट मंत्री होते. मात्र, या सरकारमध्ये सोलापूरच्या वाट्याला एकही मंत्रीपद आलेले नाही.काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव मंत्रीपदासाठी चर्चेत होते. मात्र ऐनवेळी ते मागे पडले. उस्मानाबादमधून तानाजी सावंत (शिवसेना) यांचेही नाव चर्चेत होते. मात्र त्यांना संधी न मिळाल्याने ते नाराज झाले. पूर्व विदर्भातील अकोला, वाशिम या जिल्ह्यांना मंत्रीपद मिळाले नाही. पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार असताना एकालाही संधी मिळाली नाही. त्यामुळे संग्राम थोपटे नाराज झाले आहेत.मंत्रिमंडळात वंचित राहिलेले जिल्हे असे- पालघर, सोलापूर, गोंदिया, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, अकोला, वर्धा, धुळे, वाशिम, गडचिरोली आणि भंडारा.
Maharashtra Cabinet Expansion: राजकीय वारसदारांची चांदी; मंत्रिमंडळ विस्तारात मिळाली संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 3:15 AM