मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळ अधिवेशनापूर्वी होणार की नाही, याबाबतची अनिश्चितता कायम आहे; मात्र २६ फेब्रुवारीला विस्तार होऊ शकतो, अशी अटकळ लावली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी सायंकाळी राजभवनात राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात पहिल्याच दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होईल.
रमेश बैस राज्यपालपदी आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्याशी एकत्रित भेट होऊ शकलेली नाही. आज ती भेट झाली तर त्यात विस्तारावर शिक्कामोर्तब होईल की विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संयुक्त सभागृहासमोर राज्यपालांनी द्यावयाच्या भाषणासंदर्भात चर्चा होईल, याबाबतही अनिश्चितता आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने २६ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.