मुंबई - महाराष्ट्राच्या राजकीय सत्तानाट्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी झाला. सरकार स्थापन होऊन ३५ दिवस झाले तरीही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची एका महिन्यात ६ हून अधिक वेळा दिल्ली वारी झाली. अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाला नाही. परंतु शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची ५ ऑगस्ट ही तारीख पुढे आली परंतु सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर त्यावरही ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे.
३० जूनला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर ४ जुलै रोजी विधानसभेत सरकारने बहुमताचा ठराव जिंकला. परंतु सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग दोन्हीकडे एकनाथ शिंदेविरुद्ध उद्धव ठाकरे असा डावपेच सुरू असल्याने कॅबिनेट विस्तार रखडला आहे. त्याशिवाय शिंदे गट आणि भाजपा यांच्यात खातेवाटपावरून सहमती बनत नसल्यानेही मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं बोलले जात आहे. सरकार चांगले काम करत असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी या आठवड्यात रविवारच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सूतोवाच केले. त्याच आधारे ५ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली. परंतु सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रहण लागलं आहे. सुप्रीम कोर्टाची सुनावणी ८ ऑगस्टला होणार आहे. हे प्रकरण घटनापीठाकडे जाणार की नाही यावर सर्वांचे लक्ष लागलं आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत कॅबिनेट विस्तार टळला आहे.
१५ ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागेल - मुनगंटीवार मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे माहिती नाही. परंतु एक नक्की १५ ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागेल. कारण अमृत महोत्सवी वर्षाचं हे झेंडावंदन आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या पूर्वा राज्यात रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होईल असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. तर मंत्रिमंडळ विस्तार उद्याच करायचा असेल तर त्यालाही बंधन नाही. दिल्लीवारी वाढली म्हणजे याद्या निश्चित झाल्या असतील. मुख्यमंत्री राज्यपालांना तारीख कळवतील त्यानंतर शपथविधी सोहळा पार पडेल असा विश्वास शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.