- मनोहर कुंभेजकर मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून आमदार व विभागप्रमुख अनिल परब यांची ओळख आहे. मंगळवारी त्यांचा वाढदिवस असून, सोमवारी मंत्रिपदाचा घेतलेली शपथ ही त्यांना मिळालेली वाढदिवसाची भेट असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे.शिवसेनेची बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडणारे आणि संघटन कौशल्य, तसेच निवडणुकीचे यशस्वी तंत्र राबविण्यात ते तरबेज आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी, म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अनेक वेळा शिवसेनेची बाजू प्रभावीपणे मांडली.महाआघाडीचे सरकार राज्यात आणण्यासाठी त्यांनी शिवसेनेची बाजू सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे मांडली. २६ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. महाआघाडी सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेचा, तसेच ठाकरे घराण्याचा पहिला मुख्यमंत्री राज्यात विराजमान झाला. अनिल परब हे शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. कायद्याचे अचूक ज्ञान असणारे व गृहनिर्माणच्या प्रश्नांवर डॉक्टरेट प्राप्त करणाऱ्या परब यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या, पण शिवसैनिकांना मात्र आनंद झाला आहे.वांद्रे पूर्व, गांधीनगर येथे इमारत क्रमांक ५८मध्ये तळमजल्यावर ते लहानाचे मोठे झाले. भारतीय विद्यार्थी सेनेचे काम करत असताना, अतुल सरपोतदार यांच्या बरोबरीने त्यांनी कामाला सुरुवात केली. सरपोतदारांच्या प्रत्येक निवडणुकीत मुख्य भूमिका निभावत वांद्रे पूर्व परिसरात आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात ते आले आणि आता पंचवीस वर्षांनी ते उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाऊ लागले.१९९५च्या युतीच्या सत्ताकाळात वांद्रे खेरवाडी मतदार संघाचे उपविभागप्रमुख म्हणून त्यांनी शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली. जसजशी उद्धव ठाकरे यांची शिवसेनेत मांड घट्ट बसू लागली, तसतशी अनिल परब व मातोश्री यांचे संबंध दृढ होत गेले.सेनेचे पालिकेतील बळ वाढविण्यात महत्त्वाचा वाटाविभागप्रमुख पदानंतर अवघ्या तीन वर्षांच्या काळात पहिल्यांदा ते विधानपरिषदेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना आंदोलनाच्या वेळी झालेल्या केसेसमध्ये स्वखर्चासहित मदत करणे हे त्यांचे आवडते काम आणि याच कारणामुळे त्यांची लोकप्रियता शिवसैनिकांमध्ये टिकून आहे. सर्व प्रकारच्या निवडणुकीच्या कामाची आखणी करण्यात व विधिमंडळात शिवसेनेची भूमिका ठळकपणे मांडण्यात अनिल परब यांचा हातखंडा आहे. २०१७च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची भूमिका मुंबईकरांमध्ये ठसवण्यात, तसेच त्या संपूर्ण काळात भाजपला अंगावर घेऊन महापालिकेत विश्वनाथ महाडेश्वर यांच्या रूपाने महापौर करण्यात परब यांचा मोठा वाटा आहे. मनसेचे ६ नगरसेवक पक्षामध्ये घेऊन सेनेचे पालिकेतील बळ वाढविण्याचे श्रेयही अनिल परब यांच्याकडेच जाते.
Maharashtra Cabinet Expansion: आज वाढदिवस, काल मंत्रिपदाची शपथ; उद्धव ठाकरेंकडून खास माणसाला बर्थडे गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 3:35 AM