Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आल्याचे दिसत आहे. भाजपकडून गुजरात पॅटर्न आणून सर्व नवीन चेहरे दिले जातील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे, शिंदे गटातून नेमक्या कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याबाबत अद्यापही सस्पेंस कायम आहे. यातच आता शिंदे गटासोबत गेलेल्या एका आमदारांना मंत्रिपद नको असल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करत शिंदे गटात सामील झालेल्या आमदार सुहास कांदे यांनी आपल्याला मंत्रिपद नको, असे सांगितले असल्याचे म्हटले जात आहे. मला मंत्रीपद नको, मला फक्त पक्षाची सेवा करायची आहे, असे स्पष्ट करत, शिंदे गटात कुणीही नाराज नसल्याचा दावा सुहास कांदे यांनी केला आहे. तत्पूर्वी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदे गटाच्या सर्व ५० आमदारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्र्यांची नावे निश्चित होणार आहे.
अब्दुल सत्तार यांना मंत्री करायचे की नाही, त्यावरही चर्चा
टीईटी घोटाळ्यात नाव आलेल्या अब्दुल सत्तार यांना मंत्री करायचे की नाही, त्यावरही चर्चा होणार आहे. तसेच उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आणि पुढे कोणाला संधी मिळणार, यावरही खलबतं सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात बोलताना, गेल्या दोन दिवसांपासून बातम्यांमध्ये ज्या पद्धतीने मांडणी करण्यात आली ते अत्यंत चुकीच आहे. टीईटीचा कोणताही फायदा माझ्या मुलांनी घेतला नाही. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. मला मुख्यमंत्र्यांनी बोलावले आहे, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
दरम्यान, भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, माधुरी मिसाळ, संभाजी पाटील निलंगेकर, सुरेश खाडे, मंगल प्रभात लोढा, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण यांची तर शिंदे गटाकूडन उदय सामंत, दीपक केसरकर, दादा भुसे, संजय राठोड, संजय शिरसाट, तानाजी सावंत, संदिपान भुमरे, शंभुराज देसाई यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.