Maharashtra Cabinet Expansion : ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होतो तेव्हा नाराजीनाट्य होतंच - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 08:40 AM2022-08-09T08:40:38+5:302022-08-09T08:41:09+5:30
Maharashtra Cabinet Expansion : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन करून शपथविधी सोहळ्याला येण्याचं निमंत्रण दिल्याची पवार यांची माहिती.
राज्य मंत्रिमंडळाचा गेले ३८ दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी ११ ला राजभवनवर होणार आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. शपथविधी समारंभासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आदींना निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान, यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होतो तेव्हा नाराजीनाट्य हे होतंच असं म्हटलं.
“११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार आहे. कालच देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन करून सांगितलं, निमंत्रणही आलं आहे. मी विरोधीपक्ष नेता या नात्यानं मंत्रिमंडळ विस्तारासाठी हजर राहणार आहे,” असं अजित पवार म्हणाले. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
“नाराजी बद्दल मला काहीच माहित नाही. कोणाचंही सरकार असतं, मंत्रिमंडळाचा विस्तार होतो तेव्हा अनेकांना वाटतं आपण काम केलं आहे, का संधी मिळत नाही?. ज्यांना संधी मिळते ते समाधानी आणि खूश असतात. ज्यांना ती मिळत नाही त्यांची नाराजी पाहायला मिळते. हे पूर्ण मंत्रिमंडळ नाही अशी ऐकीव बातमी आहे. त्यामुळे किती लोकांचं मंत्रिमंडळ आहे माहित नाही. जे राहिले आहेत, त्यांना तिसऱ्या टप्प्यात संधी देऊ असं सांगू नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतील,” असं ते म्हणाले. शपथविधी घेऊन नंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतील. त्यानंतर अधिवेशनाबाबत, कामकाज सल्लागार समितीबाबतही चर्चा करतील, अधिवेशन व्यवस्थित पार पडण्याकरिता तिसरा टप्पा हा अधिवेशनाच्या नंतर शपथविधी पार पडेल अशा आपला अंदाज असल्याचंही ते म्हणाले.