ठाणे/मुंबई : राज्य मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने नाराज झालेले ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्वेग व्यक्त करताना ‘आज आमची लायकी नाही, असे कदाचित पक्षाला वाटत असेल. मात्र, आम्ही आमची लायकी सिद्ध करू आणि पक्षाला दखल घेण्यास भाग पाडू,’ अशा शब्दांत नाराजीला तोंड फोडले. सरनाईक हे तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनीही मंत्रिपद न मिळाल्याने, आमदारकीचा राजीनामा देण्याचाच इशारा पक्षाला दिल्याची चर्चा रंगली होती. मात्र रात्री त्यांनी नाराजीचे खंडन केले. राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या विस्तारात ठाण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचा समावेश झाला. त्याचबरोबर, शिवसेनेतून प्रताप सरनाईक यांचा समावेश होईल, अशी त्यांची व त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती, पण समावेश न झाल्याने त्यांनी तिरकस शैलीत नाराजी व्यक्त केली.मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात ठाण्यातून एकनाथ शिंदे यांचा समावेश झाला. त्यामुळे विस्तारात ठाणे जिल्ह्याला अधिक प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा होती. कारण मुंबईत भाजपने शिवसेनेपेक्षा अधिक यश मिळवले असताना ठाण्यात मात्र शिवसेनेने गड राखले. किमान एक कॅबिनेट मंत्रिपद व एक राज्यमंत्रिपद अजून शिवसेना ठाण्यात देईल, अशी अपेक्षा होती. राज्यमंत्रिपदासाठी शिवसेनेतून रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा होती. फाटक यांचा समावेश झाला नसला, तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख आहेत, त्यांच्या आदेशानुसारच पुढेही काम करू, असे सांगत आपण नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली. शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याचे बक्षीस आव्हाड यांना मिळाले. आव्हाड आणि सरनाईक हे परस्परांचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे आव्हाड मंत्री होत असताना, सरनाईक यांना तब्बल तीन वेळा निवडून येऊनही संधी नाकारली गेल्याने त्यांचे समर्थक नाराजी व्यक्त करीत आहेत.पदासाठीची खेळी चुकली?आपल्याच पक्षातील काही मंडळी मंत्रिपद मिळू देणार नाहीत, या धास्तीपोटी सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात होती. सरनाईक यांची ही खेळीच त्यांच्या अंगलट आली नाही ना? अशी शंका काही जण व्यक्त करीत आहेत. सरनाईक हे थेट ‘मातोश्री’च्या संपर्कात असल्याने, त्याचा काहीसा राग मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात असल्याच्या चर्चा कायम रंगतात. आता सरनाईक यांचा पत्ता कापला गेल्याने त्याला पुष्टी मिळाल्याचा तर्क सेनेच्याच वर्तुळात लढविला जात आहे. मात्र, शिंदे, आव्हाड, सरनाईक यांचे मतदारसंघ एकाच ठाणे महापालिकेत असल्याने, एका पालिकेतून किती जणांना प्रतिनिधित्व देणार, उरलेल्या जिल्ह्याला काहीच देता आलेले नाही, याकडेही शिवसेनेच्या नेत्यांनी लक्ष वेधले.एक आमदारकी, दोन नगरसेवक पदे घरातप्रताप सरनाईक हे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. शिवाय, त्यांच्या घरात पत्नी परिषा सरनाईक व पुत्र पूर्वेश सरनाईक यांच्याकडे दोन नगरसेवक पदे आहेत. त्यांच्या सहकाºयाची पत्नी आशा डोंगरे यांनाही नगरसेवकपद देण्यात आले आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीला किती द्यायचे, हा विचार करून पक्षप्रमुखांनी सरनाईक यांना तूर्त मंत्रिमंडळाच्या बाहेर बसविल्याचे शिवसेनेतील काहींचे म्हणणे आहे.आमदारकी सोडण्याच्या चर्चेला सुनील राऊत यांचा पूर्णविराममी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. त्यामुळे उद्धवसाहेबांचा, शिवसेनेचा आदेश पाळणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. माझ्या कृतीमुळे पक्षांतर्गत अनागोंदी माजेल, विरोधकांचे फावेल, असे कोणतेही पाऊल मी उचलणार नाही. मंत्रिपद मिळो अगर ना मिळो, मी माझ्या मतदारसंघात तितक्याच ताकदीने पक्षाचे काम करत राहीन. मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज आहे किंवा मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे, ही पसरवली जाणारी माहिती अफवा असल्याचे सुनील राऊत यांनी स्पष्ट केले.महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना नेते संजय राऊत मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला. मात्र मोठ्या प्रमाणावर रंगणाºया या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.‘लोक मंत्रिपदाच्या अपेक्षा ठेवू शकतात, पण आम्ही अशा अपेक्षा ठेवत नाही. पक्ष आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पक्षासाठी काम करणे आमचे कर्तव्य आहे आणि हे आमचे बाळासाहेबांना वचन आहे. कायम पक्षाबरोबर राहू आणि पक्षवाढीसाठी योगदान देऊ, राहिला भावाचा प्रश्न; तर त्याने कधीच मंत्रिपदाची अपेक्षा केली नव्हती. त्यामुळे नाराज होण्याचे कारण नाही,’ असेही संजय राऊत यांनी सांगितले.
Maharashtra Cabinet Expansion: 'लायकी सिद्ध करूनच मंत्रिपद मिळवू!'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 4:14 AM