अखेर ठरलं! राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 जूनला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 05:15 PM2019-06-11T17:15:35+5:302019-06-11T17:18:49+5:30
मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी शिवसेना, भाजपामधील अनेकजण उत्सुक
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. 14 जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं वृत्त 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेचे अनेक आमदार उत्सुक आहेत. तर आज दुपारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या चार बंडखोर नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे मंत्रिमंडळात नेमकं कोणाला स्थान मिळणार, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आज काँग्रेस, राष्ट्रवादीचे बंडखोर नेते राधाकृष्ण विखे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यापैकी राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत आणखी सहा जणांची मंत्रीपदी वर्णी लागेल. यात शिवसेनेच्या केवळ एकाच आमदाराला मंत्रीपद मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकूण सात जागा भरल्या जातील. त्यासाठी शिवसेना, भाजपा आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. कॅबिनेट विस्तारात भाजपा आमदार आशिष शेलार, संजय कुटे, अतुल सावे, प्रशांत बंब यांना स्थान मिळू शकतं. राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांनादेखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि बंडखोर नेते विजयसिंह मोहिते यांना राज्यपालपद दिलं जाऊ शकतं.