ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - बदलाची सुरुवात नुकतीच झाली आहे. येत्या दोन, तीन वर्षात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसेल. 2019 साली तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा बदललेला महाराष्ट्र तुम्हाला दिसेल. त्यासाठी मी आणि माझे सहकारी मंत्री करत आहेत. आमचे ध्येय प्रामाणिकपणा, पारदर्शिता आणि विकासाचे राजकारण करण्याचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पॉलिटिकल ट्रान्सफॉर्मर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी या पुरस्काराबाबत आभार व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बदलाची नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे मला थोडा लवकरच पुरस्कार मिळालाय, असे मला वाटते. पण तुम्ही 2019 मध्ये जेव्हा मागे वळून पाहाल तेव्हा ह्या पुरस्काराला पात्र काम महाराष्ट्रात झालेले दिसेल. त्यासाठी मी आणि माझे मंत्रिमंडळ काम करेल, असा मी शब्द देतो.
आज मला प्रतिभाताई आणि राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे. या पुरस्कारासाठी दर्डा परिवाराचे आभार मानतो. आमचे राजकारण प्रामाणिकपणा, पारदर्शिता आणि विकासाचे आहे. हेही येथून मी राज्यातील तरुणांना आश्वासन देऊ इच्छितो, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर च्या चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" आणि वैद्यकीय यामधील 14 जणांना आणि स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले . त्यात देवेंद्र फडणवीस यांना राजकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला आहे.
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.