मुंबई : मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्यावरुन विधानसभेत रणकंदन सुरु आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन विरोधाकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनाच लक्ष केले. ते म्हणाले, विरोधकांच्या मनात मराठा आरक्षणावरुन काळंबेरं आहे. त्यांच्याकडून मतांचं राजकारण करण्यात येत आहे.
मंगळवारी मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल पटलावर मांडण्यावरुन चर्चा करण्यात आली. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारची कार्यवाही नियमानुसारच सुरु आहे. मराठा आरक्षणाचा एटीआर सभागृहात मांडणार आहे. राज्यात सध्या 50 टक्के आरक्षण आहे, 52 टक्के नाही. त्यामुळे एसईबीसीचे 2 टक्के आरक्षण जिवंत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
तत्पूर्वी, विरोधी पक्ष मराठा आरक्षणाला अडथळा आणणार नाही. मात्र, अहवाल सभागृहात सादर केला नाही, त्यामुळे मराठा समाजात संदिग्धता निर्माण झाल्याचे अजित पवार म्हणाले. मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांचे देणे म्हणून तरी अहवाल सभागृहात मांडा, असा टोलाही अजित पवार यांनी सरकारला लगावला. याचबरोबर, धनगर आरक्षणाच्या मुद्यावरुन सुद्धा अजित पवार यांनी सरकारवर टीका केली. टिसच्या अहवालाबाबत सरकार नेमका कोणता अभ्यास करत आहे, असा सवाल त्यांनी यावेळी केला.