मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज (8 ऑगस्ट 2021 ) रात्री 8 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मीडियावरून पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती, कोरोना लसीकरण, लोकल प्रवास या मुद्द्यांवरून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी याआधीच जाहीर केली आहे. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात आता पुन्हा वाढ होणार की निर्बंध आणखी शिथिल केले जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. सध्या मुंबईच्यालोकलमध्ये सर्वसामान्य नागरिकांना असलेली प्रवास बंदी यापुढील काळातही कायम राहणार का?, लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळणार का? याबाबत सरकार कोणता निर्णय घेतंय याकडे लक्ष असणार आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. या सवलतींच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. यादरम्यान आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
वर्षा येथील समिती सभागृहात शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील हॉटेल व्यावसायिकांच्या प्रमुख संघटनांच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा केली. या बैठकीस संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह टास्क फोर्सचे डाॅ. शशांक जोशी, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, डॉ. पी. व्ही शेट्टी, रवी शेट्टी, राकेश शेट्टी, सुकेश शेट्टी, हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे वरीष्ठ उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी, एफएचआरएआयचे गुरबक्षीस सिंग कोहली आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याला सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरळीत करायचे आहेत. आपण पहिल्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यात मोकळ्या जागांवरील व्यवहारांवरील बंधने कमी केली आहेत. पण इनडोअर बाबींबाबत सावध पावले टाकावी लागतील. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मोठी गरज भासली. तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढली, तर ऑक्सिजनची मागणी वाढू शकते, असे केंद्रीय यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. आताही मोठी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांचा ऑक्सिजन उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात येईल. निर्बंध शिथिलतेनंतर संसर्ग आणि रुग्णसंख्येचा आढावा घेतला जाणार आहे. टास्क फोर्सचे डॉ. जोशी यांनी हॉटेल व्यावसायिकांना कर्मचाऱ्यांचे लसीकरण, स्वच्छतागृहांची रचना याबाबत सूचना केल्या. सोमवारी टास्क फोर्स बैठक होणार असल्याने आम्ही पुढील निर्णयाच्या प्रतिक्षेत आहोत, असे आहारचे शिवानंद शेट्टी म्हणाले.