मुंबई - महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नवाब मलिक यांनी भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीनंतर मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी, आम्ही बहुमत चाचणीत भाजपा सरकारचा पराभव करू, असे मलिक यांनी म्हटले. हजेरीसाठी दिलेल्या पत्रावर शपथविधी सोहळा पार पडला. जेव्हा विधिमंडळ अधिवेशन सुरू होईल, तेव्हा बहुमत सिद्ध करण्याच्या निवडणुकीत आम्ही भाजपाला पराभूत करू. त्यानंतर महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होईल, असा विश्वासही मलिक यांनी बोलून दाखवलं.
भाजपाने अजित पवारांच्या अनपेक्षित पाठिंब्यामुळे सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचेअजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर राज्यातील राजकारणात भुकंप झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. त्यावर, शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त करत, अजित पवारांचा तो निर्णय वैयक्तिक असल्याचं म्हटलंय. तसेच, राष्ट्रवादी पक्षाचा या निर्णयाला पाठिंबा नसल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे या राजकारणात वेगळच ट्विस्ट पाहायला मिळालं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला 43 आमदारांची उपस्थिती होती.
''अजित पवारांनी जो निर्णय घेतला, त्यास पक्ष सहमत नाही. त्यामुळेच, अजित पवारांना विधिमंडळ नेतेपदावरुन हटविण्यात आले आहे. तुर्तात जयंत पाटील यांच्याकडे तो अधिकार देण्यात आला आहे. केवळ 5 आमदार आमच्या संपर्कात नाही, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. 6 आमदार लवकरच येथे पोहोचतील. त्यामुळे आमदारांच्या संख्याबळाच्या जोरावर आम्ही छोरी छोरी छुपके छुपके.. बनविण्यात आलेलं सरकार पराभूत करू, असे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.