पुणे - राज्यातील सत्तासंघर्षात अजित पवारांनी केलेले बंड चांगलेच गाजले असून अजित पवारांची नाराजी दूर करण्यात कुटुंबाला यश आलं. अजित पवारांनी भाजपाशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात घातली त्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला, शरद पवार यांच्या कुटुंबासह राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याचं चित्र निर्माण झालं.
अजित पवारांच्या बंडाने बहिण सुप्रिया सुळेही भावूक झाल्या. अजित पवार समर्थकांनी दादांचा निर्णय योग्यच आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्या, मात्र 4 दिवसात अजित पवारांची मनधरणी करुन कुटुंबाने पक्षात आणि परिवारात पडणारी फूट रोखली. अजित पवार पक्षात पुन्हा परतले अन् राजकारणात सक्रीय असल्याचं दाखवून देत आहे. पण अजित पवारांच्या बंडामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि नेत्यांची मागणी असली तर हा निर्णय सर्वस्वी शरद पवारांवर अवलंबून आहे. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या सर्व घडामोडीत पुन्हा एकदा बारामतीत अजित पवारांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले आहेत. यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यात लिहिलं आहे की, दादा आपण राज्यात प्रथम क्रमांकाने निवडून आला आहात, आता आपले नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केले, महाराष्ट्राला आपली गरज आहे, आपण थांबू शकत नाही, आपण काय करायचं याचा निर्णय आता आम्हाला घेऊ द्या, भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय असं मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यावर समस्त बारामतीकर असा उल्लेख असल्याने नेमके हे बॅनर्स कोणी लावले याची स्पष्टता नाही.
मात्र एकीकडे राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन होतं आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर शपथ घेणार आहेत, पुढील 5 वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असं नेत्यांकडून सांगण्यात येत असताना अजित पवारांच्या समर्थनार्थ लावलेल्या या बॅनर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे अजित पवारांना मंत्रिपद मिळणार की नाही यापेक्षा त्यांना मुख्यमंत्रिपदाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बॅनर्सद्वारे सुतोवाच करायचं आहे हे आगामी काळात स्पष्ट होईल.