मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेमध्ये राष्ट्रवादी आमदारांच्या सह्याचं पत्र भाजपाला पाठिंबा म्हणून अजित पवारांनी राज्यपालांना सादर केले. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत १०-११ आमदार उपस्थित होते. मात्र यातील काही आमदार शरद पवारांच्यासोबत आलेत. त्यामुळे अजित पवारांसोबत किती आमदार आहेत याची स्पष्टता अद्याप आली नाही.
राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांपैकी ४१ आमदारांच्या सह्याचं पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजभवन कार्यालयात जमा केले. अजित पवार हे आमचे गटनेते नाही अशाप्रकारचे पत्र होतं त्यावर ४१ आमदारांची सही होती. त्यामुळे उर्वरित अजित पवारांसह १२ आमदारांनी सह्या केल्या नाहीत मग १२ आमदार नेमके कुठे गेले असा प्रश्न उपस्थित राहतो. याबाबत जयंत पाटील यांनी काहीवेळापूर्वी सांगितले आहे की, आमचे आमदार परतत आहेत. ४९-५० आमदार आमच्यासोबत आहेत. आज दुपारी २.३० वाजता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमके किती आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत हे स्पष्ट होईल.
दरम्यान, अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते आहेत, त्यांची नियुक्ती वैध आहे, त्यामुळे जर अजित पवारांनी व्हिप जारी केला तर तो राष्ट्रवादीच्या आमदारांना बंधनकारक असेल असं विधान भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात हे सरकार सभागृहात बहुमत सिद्ध करेल असा दावा केला आहे.
तसेच आज झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते राहिले नाहीत, याबाबत राज्यपाल कार्यालयाला माहिती देण्यात आली आहे असं अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात सांगितलं. राष्ट्रवादीच्या ४१ आमदारांनी सह्या करुन अजित पवार आमचे गटनेते नाहीत असं राज्यपालांना कळविण्यात आलं आहे. अजित पवारांचा दावा खोटा होता असं अभिषेक मनु सिंघवी सांगितले. तसेच विधानसभा सभागृहात तातडीने बहुमत सिद्ध करण्याची मागणी सुप्रीम कोर्टात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केली होती. पण न्यायालयाने याबाबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना नोटीस जारी करत उद्या सकाळी १०.३० पर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.