मुंबई - भाजपाने थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शरद पवारांना अंधारात ठेवून अजितदादांनी हा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
'अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे' असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवारांना याबाबतची कल्पना होती का, याबाबत स्पष्टपणे सांगितले नाही. शरद पवार साहेबांना सुरुवातीच्या काळात या गोष्टी माहित्या होत्या. परंतू नंतरच्या काळामध्ये पहिल्या काळात त्यांना मी स्थिर सरकार देण्याबाबत सांगत होतो. कोणीतरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नव्हते. या आधीही काँग्रेस, राष्ट्रवादीने स्थिर सरकार दिले आहे. शिवसेना-भाजपाने स्थिर सरकार दिले आहे, असे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सांगितले.
रातोरात सोंगट्या बदलल्या कशा?
काल रात्री काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक फिस्कटली होती. यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघे राज्यपालांना भेटले. एक वाजता राज्यपालांनी केंद्राकडे शिफारस केली. राष्ट्रपती राजवट हटवण्याची सकाळी सातची शपथविधीची वेळ ठरली. काँग्रेस शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. यात प्रफुल्ल पटेल यांनी मोठी भुमिका बजावली आहे.
शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार अशा घडामोडी सुरू असतानाच आज राजभवनातून मोठी घडामोड समोर आली आहे. राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार आलं आहे. शनिवारी (23 नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेगळेच वळण घेतले आहे. हे एका रात्रीत घडलेले असल्याचे समजत आहे. 24 ऑक्टोबरला निकाल लागला. तेव्हापासून आतापर्यंत कोणीही सरकार बनवू शकले नाही. महाराष्ट्रासमोर मोठी संकटे आहेत. शेतकऱ्यांवर संकट आले आहे. या समस्या सोडविण्यासाठी व निर्णय वेगवान करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. गेले एक महिनाभर चर्चा काही संपतच नव्हती. मार्ग निघत नव्हता. नको त्या मागण्या पुढे येत होत्या. हे पाहता आताच अशा समस्या येत असतील तर हे तीन पक्षांचे सरकार पुढे कसे टिकणार. यामुळे मी निर्णय घेतला, असे अजित पवार यांनी सांगितले.