'कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 02:41 PM2020-02-24T14:41:42+5:302020-02-24T14:55:44+5:30
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात कर्जमाफी जाहीर केली होती.
नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लगेच जाहीर करणार असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात कर्जमाफी जाहीर केली होती. त्यातील पहिला टप्पा दोन लाखांच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी होता वीस ते पंचवीस हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा दुसरा टप्पा राहणार आहे. कर्जमाफी देताना गोंधळ होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.
याशिवाय, यापूर्वी तीन योजनांचे एकत्रीकरण करून कर्जमाफी देण्यात आली होती. त्यामुळे बर्याच अडचणी आल्या होत्या. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड ग्रामपंचायतच्या माध्यमातून बँकेत जमा करण्यासंदर्भात आपण अकोला जिल्ह्यात सूचना दिल्या असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी दिली.
अजित पवारांकडे विधानपरिषदेचे नेतेपद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी कामकाज सुरु होताच अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. याआधी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई हे विधानपरिषदेचे सभागृह नेते होते. त्यांच्या जागी अजित पवारांची निवड करण्यात आली आहे.
तालिका सभापती
सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी तालिका सभापतींच्या नावांची घोषणा केली. शिवसेना सदस्य गोपिकीशन बाजोरिया, राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, भाजपाचे अनिल सोले आणि शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे अर्थसंकल्पीय अधिवेशनात तालिका सभापती म्हणून काम पाहतील.
आणखी बातम्या...
अर्थसंकल्पीय अधिवेशन : पहिल्याच दिवशी अवघ्या १३व्या मिनिटाला संपले कामकाज
अजित पवारांकडे विधानपरिषदेचे नेतेपद; तालिका सभापतींच्या नावांचीही घोषणा
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही : प्रवीण दरेकर
शेतकरी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजपाचा विधानसभेत गदारोळ