मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून सत्तास्थापनेचा दावा करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपरथ घेतल्याने राज्याने काल मोठा राजकीय भूकंप अनुभवला होता. यावरून कालचे वातावरण ढवळून निघाले होते. शरद पवार यांनी यातून सावरत संध्याकाळच्या बैठकीला 54 पैकी 49 आमदारांना हजर केले होते. या सर्व घडामोडींवर आजचा दिवसही महत्वाचा ठरणार आहे.
शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. यावर आज सकाळी 11.30 वाजता तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. याचिकेमध्ये विधानसभेचं अधिवेशन तातडीने बोलवावं, 24 तासांत फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सभागृहात आवाजी मतदानाने ठराव संमत करू नये. या संपूर्ण घडामोडीचे व्हिडीओ चित्रीकरण कराव अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
दरम्यान आज सकाळपासूनच राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडेशरद पवारांच्या भेटीसाठी सिल्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यांचेसोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे देखील सिल्हर ओकवर पोहोचले आहेत. काकडे आणि अजित पवार यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. यामुळे कदाचित काकडे दोन्ही पवारांमध्ये समेट घडवू आणण्याचा प्रयत्न करू शकतात.
भाजपकडे १०५ आमदार आहेत. त्यांना १४ अपक्षांचा पाठिंबा आहे. शिवसेनेसोबत असलेल्या सातपैकी तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा आपल्याला मिळेल, असा भाजपचा दावा आहे. ते खरे ठरले तर हे संख्याबळ १२२ होईल. तरीही भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी २३ आमदारांची आवश्यकता असेल. अजित पवार यांच्या नेतृत्वात किती आमदार फुटतील यावर अवलंबून असेल.