Maharashtra CM: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. भाजपसह शिंदेसेनाही मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहे. दरम्यान, आता भाजपचे देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असणार आहेत. येत्या दोन दिवसात याची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता एक मोठी माहिती समोर येत आहे. भाजपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची घाई नाही, त्यामुळे आधी नवीन सरकारमधील विभागांचे वाटप होणार आहे. दरम्यान, राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी मंगळवारी सकाळी एकनाथ शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली, त्यामुळे महायुतीला पुढचा मुख्यमंत्री ठरवण्यास थोडा वेळ मिळाला आहे. यादरम्यान आधी खातेवाटप ठरवले जाण्याची शक्यता आहे.
एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, राज्यातील भाजपच्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, केंद्रीय नेतृत्वाला मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची घाई नाही. आम्हाला निर्णायक जनादेश मिळाला आहे, त्यामुळे आधी खातेवाटप आणि पालकमंत्र्यांसारख्या महत्त्वाच्या पदांच्या वितरणास पक्षाचे प्राधान्य असेल. महायुतीमध्ये भविष्यात संघर्ष टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
288 सदस्यांच्या राज्य विधानसभेत कॅबिनेट आणि राज्य या दोन्ही स्तरांवर जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात. राज्यात 36 जिल्हे आहेत आणि त्या प्रत्येकाला प्रतिनिधीत्व मिळावे, याची असा महायुतीचा दृष्टीकोन आहे. या सर्व बाबींचा विचार करता मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात विलंब होत आहे. एकदा का या सर्व गोष्टी ठरल्या, तर मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली जाणार आहे.