शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार, हे जवळपास पक्कं झालेलं असतानाच महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. कुणाच्या ध्यानीमनीही नसलेली गोष्ट आज सकाळी सकाळी घडली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीच, पण त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते, शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन राज्यालाच नव्हे तर देशाला हादरवलं. त्यानंतर, राज्यात पुन्हा एकदा वेगवान घडामोडी पाहायला मिळताहेत आणि शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाक् युद्ध रंगताना दिसतंय. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात पहिली खडाजंगी झाली.
संजय राऊत तुम्ही शिवसेनेची, महाराष्ट्राची वाट लावलीत. आता तरी शांत बसा. राऊतांच्या तोंडी खंजीर खुपसल्याची भाषा शोभत नाही, अशी चपराक चंद्रकांत पाटील यांनी लगावली होती. त्याला संजय राऊत यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं. मला गप्प बस सांगायला ते शिवसेनाप्रमुख आहेत का? चंद्रकांत पाटील यांनी स्वतःचा विचार करावा. स्वतःच्या पक्षाला वाचवावं. हे चोरासारखे वागले आहेत आणि ते त्यांना महागात पडेल. चंद्रकांत पाटील, तुम्ही तोंड सांभाळून बोला. हा महाराष्ट्र आहे, असं राऊत यांनी खडसावलं.
'अजित पवार आयुष्यभर तडफडतील!'
भाजपला जाऊन मिळालेल्या अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अपमान केला आहे. त्यांनी शरद पवारांना दगा दिला आहे, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अजित पवार आयुष्यभर तडफडत राहतील, अशा तीव्र संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मात्र, अजित पवार परत येऊ शकतात. त्यांना ब्लॅकमेल केल्याची मला खात्री आहे, असं त्यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या राजकीय बातम्याः
अमित शहांचे 'ते' वाक्य होतं राजकीय भूकंपाची चाहुल, आज दिला 'धक्का'!
'अजितदादांसोबत शपथविधीला गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी सांगितली 'राज(भवन) की बात'
मी पुन्हा येईन बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही असे बोला; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
'मला आता काहीही बोलायचं नाही, माझ्या सोयीनं भूमिका मांडणार'
रामदास आठवले म्हणतात,'शिवसेना को लटकाया,राष्ट्रवादी को अटकाया'