देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मुंबईतील आझाद मैदानावर या शपथविधी सोहळ्याचं भव्य-दिव्य आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्री, अन्य राज्यांचे मंत्री, अनेक दिग्गज मंडळी, संत-महंत, लाडक्या बहिणी, शेतकरी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शपथविधी आधी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा दिवस खूप सुंदर आहे. आज देवेंद्रजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत असं म्हटलं. तसेच 'मी पुन्हा येईन' यावर देखील भाष्य केलं आहे. देवेंद्रजी यांनी आपल्या कामाचं चीज करून दाखवलं आहे. मुख्यमंत्री झाल्यावर लोकहिताचा पहिला निर्णय घेतला जाईल असंही अमृता फडणवीस यांनी सांगितलं.
"जिद्द, चिकाटी आणि संयम यामुळे देवेंद्र फडणवीस आज इथे आहेत. आजचा दिवस खूप सुंदर आहे. आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. लाडकी बहीण हा एक सुंदर प्रोजेक्ट राहिला आहे. देवेंद्रजी आणि युतीसह सर्व बहिणी प्रेमाने जोडल्या गेल्या. एखादी गोष्ट मिळावायची असेल तर आपल्याला समोर अर्जुनासारखं फक्त आपलं टार्गेट दिसायला हवं."
"गादीसाठी पुन्हा यायचं नाही. तर पुन्हा यासाठी यायचं होतं कारण त्यांना तसा विश्वास होता, लोकांना विश्वास होता की, ते महाराष्ट्रासाठी जे काही करू शकतील ते अजून कोणी करू शकत नाही. त्या विश्वासामुळेच ते पुन्हा येत आहेत, आलेत याचा आनंद आहे. देवेंद्रजी यांनी आपल्या कामाचं चीज करून दाखवलं आहे. मुख्यमंत्री झाल्यावर लोकहिताचा पहिला निर्णय घेतला जाईल" असं माध्यमांशी संवाद साधताना अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.