Maharashtra CM: ...अन्यथा देवेंद्र फडणवीस येडियुरप्पांसारखा विश्वासमताआधीच राजीनामा देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 11:51 AM2019-11-26T11:51:24+5:302019-11-26T11:52:32+5:30

उद्या ५ वाजता बहुमत चाचणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Maharashtra CM devendra fadnavis likely to resign before trust vote if there assembly speaker is not from bjp | Maharashtra CM: ...अन्यथा देवेंद्र फडणवीस येडियुरप्पांसारखा विश्वासमताआधीच राजीनामा देणार?

Maharashtra CM: ...अन्यथा देवेंद्र फडणवीस येडियुरप्पांसारखा विश्वासमताआधीच राजीनामा देणार?

googlenewsNext

मुंबई: सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच विश्वासदर्शक ठरावावर खुलं मतदान घेऊन त्याचं थेट प्रक्षेपण करण्याच्या स्पष्ट सूचना न्यायालयानं दिल्या आहेत. उद्या संध्याकाळी ५ वाजता बहुमत चाचणी होईल. त्यामुळे बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी आता केवळ ३० तास उरले आहेत. त्यामुळे 'देवेंद्र सरकार-2' संकटात सापडलं आहे. ही परिस्थिती पाहता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचा नेता निवडून आला, तरच विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायचं. अन्यथा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा, अशी भूमिका भाजपाकडून घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात अशाच प्रकारे बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नव्या सरकारला तातडीनं विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देण्यात यावा,  अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. यावर निकाल देताना न्यायालयानं उद्याच विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे भाजपाला आमदारांची फोडाफोड करण्यासाठी फार वेळ मिळणार नाही.

एका बाजूला बहुमताचा आकडा गाठण्याचं आव्हान असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीनं भाजपाला धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांचीच अधिकृत गटनेते म्हणून नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे. तशी नोंददेखील विधिमंडळ सचिवालयात आहे. मात्र याबद्दलचा अंतिम अधिकार विधानसभा अध्यक्ष घेतात. त्यामुळे अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपाचा अध्यक्ष असल्यास सकारात्मक घडामोडी घडू शकतात.

भाजपा विश्वासदर्शक ठराव जिंकेल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. तत्पूर्वी काल रात्री ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांनी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेत शक्तिप्रदर्शन केलं आहे. या आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेलं पत्रदेखील महाविकासआघाडीकडून राज्यपालांना देण्यात आलं आहे. महाविकासआघाडीनं १६२ आमदार असल्याचा दावा केल्यानं भाजपा बहुमत कसं सिद्ध करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Web Title: Maharashtra CM devendra fadnavis likely to resign before trust vote if there assembly speaker is not from bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.