मुंबई : एकीकडे शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी भाजपाशीही बोलणी सुरू ठेवली होती. तर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचीही अजित पवारांच्या बंडाला साथ असल्याचे समजते आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आज भूकंप पहायला मिळालेला आहे. आज अचानक पहाटे राष्ट्रपती राजवट उठवून राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या घडामोडींमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून शरद पवारांनाही धक्का बसला आहे.
यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज दुपारी 12.30 वाजता संयुक्त पत्रकारपरिषद घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांना सायंकाळी 4.30 वाजता बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर येत आहे. तसेच पवार यांच्या शपथविधीनंतर मुंडे यांचा फोनही स्वीच ऑफ येत आहे. यामुळे धनंजय मुंडे, सुनिल तटकरे आदी नेते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे कळत आहे.उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारही अज्ञातस्थळी रवाना झाले असून राष्ट्रवादी, शिवसेनेची पत्रकार परिषद काही वेळातच होणार आहे.