ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली. याच दरम्यान डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करुन महाराष्ट्र राज्याचा मान वाढल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
"धर्माधिकारी कुटुंब भरकटलेल्यांना मार्ग दाखवणारे दिपस्तंभ आहे. हा पुरस्कार दिल्यामुळे पुरस्काराची उंची वाढली. महाराष्ट्राचा मान सन्मान वाढला. मी मुख्यमंत्री असताना त्यांना पुरस्कार दिला जात आहे यापेक्षा दुसरा कोणताही आनंदाचा क्षण असू शकत नाही" असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच "भरकटलेल्या कुटुंबाना दिशा देण्याचे काम आप्पासाहेबांनी केलं आहे. लाखो कुटुंबात माझेही एक कुटुंब होते. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला, त्यावेळी आनंद दिघे यांनी आधार दिला. तर आप्पासाहेबांनी समाजाची सेवा करण्याचा मार्ग दाखवला. त्यांचे मोठे योगदान मी कधीही विसरू शकणार नाही" असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
"एवढ्या महासागरासमोर काय बोलावं समजत नाही. मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही तर मी परिवारातील श्री सदस्य म्हणून बोलत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विनंतीला मान देऊन गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानले. सूर्य आग ओकत असताना एकही माणूस जागेवरून उठत नाही हे आप्पासाहेबांचे आशीर्वाद आहेत. शिस्तीचे पालन सर्व सदस्य करत आहेत. माझी पत्नी आणि मुलगा श्रीकांत समोर बसला आहे. लहान मोठा कोणी नाही" असं मुख्यमंत्री म्हणाले.
"आप्पासाहेबांची जादू पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी, त्याचे उदाहरण आपण पाहतोय. आजच्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड आप्पासाहेबांचे सदस्यच मोडू शकतात. लाखो कुटंब वाचवण्याचे काम त्यांनी केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आप्पासाहेबांच्या कार्याची दखल केंद्र सरकारनेही घेतली. माणूस घडवण्याचे विद्यापीठ म्हणजे मु पो रेवदंडा" असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"