Eknath Shinde, Liz Truss: महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसवले असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. वेदांता फॉक्सकॉननंतर आता टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमहाराष्ट्रात गुंतवणूक आणि प्रकल्प टिकवून ठेवण्यात वारंवार अपयशी ठरत आहेत. त्यांना महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला हलवण्यासाठीच भाजपाने मुख्यमंत्रीपद दिले, असा हल्लाबोल महेश तपासे यांनी केला. तसेच, युकेच्या पंतप्रधान लीज ट्रस यांनी जसा राजीनामा दिला तसाच एकनाथ शिंदे यांनीही तात्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महेश तपासे यांनी केली.
CM शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी
इंग्लंडच्या राजकारणात गेल्या काही दिवसात बरीच उलथापालथ झाल्याचे दिसले. सर्वात आधी बोरिस जॉन्सन यांनी युकेच्या पंतप्रधानाचा त्याग केला. त्यानंतर लिझ ट्रस विजयी झाल्या आणि पंतप्रधानपदी बसल्या. पण त्यांना फार काळ इंग्लंडवर राज्य करता आले नाही. ४५ दिवसांत त्यांचे सरकार कोसळले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे हित जपता येत नाही. त्यामुळे युकेच्या पंतप्रधान लीज ट्रस यांनी जसा राजीनामा दिला तसा, तसेच एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महेश तपासे यांनी केली.
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या राजकीय स्वामींसमोर (भाजप) नमल्याबद्दल आणि महाराष्ट्रातून प्रकल्प गमावूनही त्याला विरोध न करता गुजरातचा महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक सुरू असताना शिंदे आपले मुख्यमंत्रीपद सुरक्षित ठेवण्यात व्यस्त आहेत. वेदांता फॉक्सकॉनमधून बाहेर पडल्यानंतर सी-२९५ मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करण्याचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात येईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले होते. पण तसे घडले नाही", असे सांगत एकनाथ शिंदे यांची भूमिका खोटारडी आहे असा अप्रत्यक्ष निशाणा महेश तपासे यांनी लगावला.