मुंबई: मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पहिली कॅबिनेट बैठक सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये पार पडली. या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी 20 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यासाठी आतापर्यंत उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती देण्याच्या सूचना यावेळी उद्धव यांनी मुख्य सचिवांना दिल्या. या बैठकीला उद्धव यांच्यासोबत शपथ घेतलेले ६ मंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव यांना महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम काल जाहीर झाला. त्यामध्ये सुरुवातीलाच सेक्युलर शब्दाचा उल्लेख आहे. त्यावरुन उद्धव यांना शिवसेना आता सेक्युलर झाली आहे का, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर सेक्युलर शब्दाचा अर्थ काय, असा प्रतिप्रश्न उद्धव यांनी प्रश्नकर्त्या पत्रकाराला केला. तितक्यात राष्ट्रवादीचे नेते आणि उद्धव यांचे मंत्रिमंडळातील सहकारी छगन भुजबळ यांनी घटनेचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांची मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सेक्युलरचा अर्थ काय? घटनेत जे काही आहे ते आहे, असं उद्धव म्हणाले.
Maharashtra CM: शिवसेना सेक्युलर झालीय का?; उद्धव ठाकरेंचं 'घटनात्मक' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 7:57 AM