Maharashtra CM : हजेरीसाठी घेतलेल्या सह्यांच्या पत्राचा गैरवापर; राष्ट्रवादीचा अजित पवारांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 11:17 AM2019-11-23T11:17:30+5:302019-11-23T11:18:14+5:30
अजित पवार यांना बहुमतासाठी 39 आमदार लागणार आहेत. भाजपाकडे काही अपक्ष आहेत. हा आकडा 36 वर येऊ शकतो. यामुळे राष्ट्रवादीचे किती आमदार अजितदादांसोबत जातात याकडे लक्ष लागले आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज सकाळीच आलेल्या भूकंपामुळे मोठे हादरे बसले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला हात नसल्याचे स्पष्ट केले आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे.
अजित पवार यांच्यासोबत शपथविधीला गेलेले राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेले आहेत. त्यांना फसवून तिथे नेण्यात आल्याचे त्यांनी पवारांना सांगितले. अजित पवार यांनी कालच्या बैठकीच्या हजेरीच्या सह्यांचे पत्र नेले. त्याचा गैरवापर केला आणि शपथ घेतल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.
तसेच राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज दुपारी 12.30 वाजता संयुक्त पत्रकारपरिषद घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांना सायंकाळी 4.30 वाजता बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.
अजित पवार यांना बहुमतासाठी 39 आमदार लागणार आहेत. भाजपाकडे काही अपक्ष आहेत. हा आकडा 36 वर येऊ शकतो. यामुळे राष्ट्रवादीचे किती आमदार अजितदादांसोबत जातात याकडे लक्ष लागून राहिलेले असताना राष्ट्रवादीचे कळवा मुंब्र्यातील नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ते कोणासोबत आहेत हे ट्विट करून स्पष्ट केले आहे.
भाजपाच्या या धक्कादायक पावलामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सतर्क झाले असून सर्वांनी मोठी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेने त्यांच्या नेत्यांना आमदार असलेल्या हॉटेलमध्ये पाठविले आहे. तर काँग्रेसही आमदारांचा कानोसा घेतला आहे.
मी मरेपर्य़ंत शरद पवार साहेबांसोबत असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी मी शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांचा असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.