'देवेंद्र 3.0' ची सुरुवात! देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; शिंदे-अजितदादा उपमुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:00 IST2024-12-05T17:59:47+5:302024-12-05T18:00:18+5:30
Devendra Fadnavis Oath Ceremony : या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह देशभरातील अनेक राजकीय नेतेमंडळी उपस्थित होते.

'देवेंद्र 3.0' ची सुरुवात! देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; शिंदे-अजितदादा उपमुख्यमंत्री
Maharashtra CM Oath Ceremony : देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्रचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुंबईतील आझाद मैदानावर हा भव्य-दिव्य सोहळा पार पडला. अशा प्रकारे राज्यात आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे.
या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील अनेक राजकीय नेतेमंडळी, साधू-संत-महंत, उद्योगपती, बॉलीवूडमधील मंडळी आणि 40 हजार नागरिक उपस्थित होते. दरम्यान शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी हिंदूहृदयसम्राड शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकेर आणि आनंद दिघे यांना वंदन केले. तसेच राज्यातील जनतेप्रतिही कृतज्ञता व्यक्त केली.
राष्ट्रगीताने आणि राज्यगीताने शपथविधी सोहळ्यालासुरुवात -
महत्वाचे म्हणजे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रगीताने आणि राज्यगीताने सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रगीतासाठी आणि राज्यगीतासाठी संपूर्ण मैदानावर लोक उभे राहिले होते.
एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ -
महत्वाचे म्हणजे, या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तत्पूर्वी, ते फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार की नाही? यासंदर्भात राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चाही सुरू होत्या. मात्र अखेर, शिवसेना आमदारांची मागणी मान्य करत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी ते राज्याचे मुख्यमंत्री होते.
अजित दादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री -
अजित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी 2010 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले होते. 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीत ते तीन राज्य सरकारांमध्ये तीन वेळा उपमुख्यमंत्री झाले. महत्वाचे म्हणजे, यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा शपथ घेत ते महाराष्ट्राचे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत.
तत्पूर्वी, नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाबहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत महायुतीला 288 पैकी तब्बल 236 जागां मिळाल्या आहेत. यात भाजपला 132, शिवसेनेला 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत.