महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करून दाखवलंच; पण राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुराही स्वतःच्या खांद्यावर घेत त्यांनी शिवसेनेच्या सोनेरी इतिहासात नवा अध्याय रचला आहे. ज्या शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोप रुजवलं आणि वाढवलं, त्याच शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
'छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई-वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन...' असे उद्गार संध्याकाळी ६.४०च्या मुहूर्तावर शिवाजी पार्कवरच्या भव्यदिव्य रंगमंचावरून घुमले आणि तमाम शिवसैनिक शहारले, थरारले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याआधी त्यांनी शिवाजी पार्कातीलच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन आपल्या वडिलांना वंदन केलं.
महाराष्ट्राच्या समाजकारणावर आणि राजकारणावर अमीट छाप उमटवणाऱ्या, राज्याचा 'रिमोट कंट्रोल' मानल्या जाणाऱ्या, मात्र सत्तेच्या खुर्चीपासून दूर राहिलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्यातील व्यक्ती थेट राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होत असल्यानं आजचा शपथविधी हा शिवसेनेसाठी अनुपम्य सोहळाच ठरला. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय स्तरावरचे आणि राज्यातील प्रमुख नेते, त्यांच्या मित्रपक्षांचे प्रमुख, मनसेचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे यांचे चुलतभाऊ राज ठाकरे यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते. याआधी २४ वर्षांपूर्वी शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी याच शिवाजी पार्क मैदानात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजपा आणि शिवसेना या जुन्या मित्रांनी, भावांनी एकत्र लढवली होती. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत ही युती केंद्रात आणि राज्यात सत्तेतही होती. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून त्यांच्यात खटका उडाला आणि हा वाद तुटेपर्यंत ताणला गेला. त्यानंतर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या भिन्न विचारधारेच्या पक्षांना सोबत घेऊन 'महाराष्ट्र विकास आघाडी'च्या झेंड्याखाली उद्धव ठाकरे यांनी सत्तास्थापनेचं समीकरण जुळवलं आणि आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार स्थापन झालं.
महाराष्ट्र विकास आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासाठी ११ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्री, राष्ट्रवादीला ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्री, काँग्रेसला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री, तर मित्रपक्षांना एक कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रिपद दिलं जाणार आहे.