मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची घटिका समीप आलेली असतानाच राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनतर यावरून राजकीय प्रतिकिया येत असून,'शिवसेना को लटकाया,राष्ट्रवादी को अटकाया' अशी प्रतिकिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
शिवसेनेला भाजपने लटकवले, काँग्रेसला फटकवले तर राष्ट्रवादीला अटकवले असल्याचे रामदास आठवले म्हणाले. भाजपचं पुन्हा सरकार यावे ही लोकांची अपेक्षा होता.मात्र शिवसनेने आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने त्यांचे मुख्यमंत्रीपद व मंत्रीपद गेले. तर शिवसेनेला धडा शिकवण्याचे काम भाजपने केले असल्याचे आठवले म्हणाले.
अमित शहा यांनी मला आधीच सांगितले होते की, तुम्ही चिंता करू नका सर्व काही ठीक होईल. त्यानुसार सर्व काही सुरळीत झाले आहे. त्यामुळे जे झाले आहे ते खूप चांगले झाले असल्याचे सुद्धा आठवले म्हणाले आहे. तसेच शिवसनेने भाजपसोबत यायले पाहिजे होते. मात्र त्यांनी राजकीय खेळ खेळण्याचे प्रयत्न केला व मुख्यमंत्रीपदासाठी केलेल्या उशिरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे आठवले म्हणाले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर सुद्धा निशाणा साधला, आमचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे राऊत म्हणत होते. मात्र आता त्यांचा मुख्यमंत्री कसा होणार असा खोचक टोला त्यांनी राऊत यांना लगावला आहे.