मुंबई - राज्यातील राजकीय अस्थिरता संपुष्टात येऊन महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची घटिका समीप आलेली असतानाच राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार आलं आहे. शनिवारी (23 नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपा आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांनी शिवसेनेची, महाराष्ट्राची वाट लावली असं म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी आता तरी शांत बसावं, राऊतांच्या तोंडी खंजीर खुपसल्याची भाषा शोभत नाही असं म्हणत चंद्रकात पाटलांनी राऊतांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. '24 ऑक्टोबरला निकाल लागले. जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला. शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावर अडून राहिली. एकदाही बसून अडीच वर्षावर चर्चा झाली नाही. सातत्याने शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भेटत राहीली पण भाजपाला भेटायला वेळ नव्हता. संजय राऊत तुम्ही शिवसेनेची, महाराष्ट्राची वाट लावलीत. आता तरी शांत बसा' असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे आभार मानले आहेत. तसेच शिवसेनेने जनादेशाला नाकारले. राज्यात तीन पक्षांचे सरकार आले तर ते टिकेल की नाही याबाबत माहिती नाही. यामुळे अजित पवारांशी संपर्क साधला आणि स्थिर सरकार देण्याची चर्चा केली. अजित पवारांना शुभेच्छा असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे मी आभार मानतो. त्यांनी पुन्हा एकदा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. राज्याच्या जनादेशाला नाकारत शिवसेनेने दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला. कोणतंच सरकार आलं नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाली. राज्यात अनेक प्रश्न आज उभे आहेत. त्यांच्यामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. जनतेने निवडून दिल्यानंतर राज्याला स्थिर सरकार मिळालं पाहिजे यासाठी अजित पवार यांनी हा निर्णय घेतला' असं म्हटलं आहे. तसेच मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. लवकरच आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करू असंही ते म्हणाले आहेत.
भाजपाने थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शरद पवारांना अंधारात ठेवून अजितदादांनी हा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
काल रात्री काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक फिस्कटली होती. यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघे राज्यपालांना भेटले. एक वाजता राज्यपालांनी केंद्राकडे शिफारस केली. राष्ट्रपती राजवट हटवण्याची सकाळी सातची शपथविधीची वेळ ठरली. काँग्रेस शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. यात प्रफुल्ल पटेल यांनी मोठी भुमिका बजावली आहे.