मुंबई - राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज उलथापालथ घडवणाऱ्या घटना घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राजकीय भूकंप झाला असून भाजपला सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे. मात्र शरद पवार यांच्या भूमिकेमुळे अजित पवारांचा मार्ग खडतर दिसत असून सुप्रिया सुळे आता राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अजित पवार यांनी आज भल्या पहाटे, भाजपच्या साथीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र अजित पवार यांच्या पाठिशी शरद पवार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर सुप्रिया सुळे यांना भावना अनावर झाल्या आहेत. तसेच पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याचे त्यांनी मान्य केले. तर प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले की, अजित पवारांसोबत असलेले आमदार शरद पवारांना भेटायला येणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या मागे आमदार किती असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण यावर अद्याप एकमत होऊ शकले नव्हते. केवळ उद्धव ठाकरे यांचे नाव चर्चेत होते. मात्र आता राज्यातील स्थिती बदलली आहे. अशा स्थितीत शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंना राज्यात पाचारण करण्यात येईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. अजित पवार राज्यात असताना सुप्रिया यांना राज्याच्या राजकारणात आणणे सोयीस्कर नव्हते. मात्र आता अजित पवार यांची हकालपट्टी होणार हे निश्चित मानले जात आहे. अशा स्थितीत सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रवादीचे राज्यातील नेतृत्व येणार किंबहुना सुप्रिया यांच्या रुपाने राज्याला महिला मुख्यमंत्रीही मिळू शकेल, असंही बोललं जात आहे.